साकोली (भंडारा) : मध्य भारतात अत्यंत दुर्मीळ असलेला अल्बिनो मांडूळ साप साकोली येथे बुधवारी एका घरी आढळून आला. निसर्गमित्र आणि वन विभागाच्या सहकार्याने या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हजारात असा दुर्मिळ साप आढळून येत असल्याचे सांगण्यात आले.
साकोलीलगतच्या सेंदूरवाफा येथील नाना खटोले यांच्या घरी बुधवारी हा साप आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती निसर्गमित्र नीलेश रंगारी यांना दिली. त्यांनी अर्शद पठाण यांच्या मदतीने या सापाला सुरक्षितपणे पकडले, तसेच याची माहिती वन विभागाला दिली. आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्धन संस्थेच्या माहितीनुसार हा साप डुरक्या घोणस (बिनविषारी) या प्रजातीचा आहे. त्याला मांडूळ म्हणूनही ओळखले जाते.
साकोलीत आढळलेला साप अल्बिनो आहे. सापाच्या शरीरातील मेलॅनिनचे प्रमाण कमी झाल्याने सापाच्या त्वचेचा रंग हळूहळू फिकट होत जातो. अल्बिनिझम ही आनुवंशिक घटना आहे. अल्बिनो साप त्याच्या वेगळ्या रंगामुळे आकर्षक दिसतो. सापाची ही प्रजात अत्यंत दुर्मीळ असून, सध्या धोक्यात आली आहे. या मांडूळ सापाचाही रंग बदलून तो विटकरी झाला आहे. हा साप कमी तापमानात बाहेर निघतो. साकोलीत आढळलेल्या या सापाची नोंद इंडियन स्नेक संस्थेकडे करण्यात आली आहे. वन विभागाचे अधिकारी खांडेकर, वनरक्षक संजय जाधव यांनी या सापाचा पंचनामा करून त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.