साकोली : विदर्भातील दुर्मिळ असा 'कॉमन बँडेड पिकॉक' म्हणजे मराठीत मयूर पट्ट फुलपाखराचे साकोली तालुक्यात प्रथमच दर्शन घडले. साकोलीतील हौशी निसर्गप्रेमी विकास बावनकुळे यांनी प्रथमच या सुंदर फुलपाखराची नोंद केली. यावर्षी विदर्भात काही ठिकाणी हे फुलपाखरू आढळून आले. परंतु, साकोली तालुक्यात प्रथमच नोंद झाल्याची माहिती कीटकतज्ज्ञ डॉ. धार्मिक गणवीर यांनी दिली.
मागील सहा वर्षांपासून विकास बावनकुळे हे निसर्ग संरक्षण, संवर्धन याचा अभ्यास करत आहेत. साकोली शहरालगत टेकडी, नर्सरी कॉलनी परिसरात भ्रमण करतान निसर्गप्रेमी विकास बावनकुळे यांनी फुलपाखराची नोंद केली. आकाराने मोठा, सतत भिरभिर करणारा, काळा रंगाच्या पंखावर निळसर हिरव्या रंगाची बँड् असून ह्या दुर्मिळ फुलपाखराचे वैज्ञानिक नाव पापिलियो क्रीनो (Common banded peacock) मराठीत 'मयूर पट्ट' असे आहे. पट्टा मयूर ही एक स्थलांतरित प्रजाती आहे, हे फुलपाखरू भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळते. यापूर्वी फक्त मयूरी या फुलपाखराची नोंद विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर येथे झाली आहे तसेच यापूर्वी डिसेंबर महिन्यात भंडारा जिल्ह्यात दिसल्याची बातमी आहे.
फुलपाखरू हे पृथ्वीवरील जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे घटक आहे. "जून २०१८ ला केलेल्या संशोधनानुसार, साकोली तालुक्यात एकूण ६९ फुलपाखरांची नोंद झालेली आहे. मयूर पट्टा या फुलपाखराची आजपर्यंत साकोली तालुक्यामध्ये नोंद नाही. यावर्षी मयूर पट्ट फुलपाखराची नोंद ही साकोली तालुक्यात विकासने प्रथम नोंद केली आहे." असे कीटक अभ्यासक डॉ. धार्मिक गणवीर, प्राणीशास्त्र विभाग, मनोहरभाई पटेल कॉलेज साकोली यांनी सांगितले आहे.
कीटक अभ्यासक डॉ. धार्मिक गणवीर यांनी साकोली तालुक्यातील फुलपाखरांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला आहे. प्रथमच आढळलेल्या फुलपाखराचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्याच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा मानस फुलपाखरू निरीक्षक विकास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. मयुराच्या नोंदीमुळे वन्यजीव व कीटक अभ्यासकांकडून विशेष अभिनंदन होत आहे.