अड्याळ : रावणवाडी जंगलात अड्याळ येथील सर्पमित्रांना दुर्मिळ हरणटोळ जातीचा साप आढळला. या सापाला इंग्रजीमध्ये ‘वाइन स्नेक’ म्हणतात. मराठी नाव हरणटोळ असून सायंटिफिक नाम ‘ahentula nasuta’ हे आहे. हा साप निमविषारी गटातील असून हा साप झाडावर राहतो. रंगाने पूर्ण हिरवा आणि लांब असतो. याची जास्तीत जास्त लांबी सहा (६) फूट असते. हा साप सरळ पिलांना जन्म देतो. सापाला डिवचल्या गेल्यास मानेजवळील खवले बाजूला करून पांढऱ्या रंगाच्या लाईन तयार करतो. तसेच तोंड फाडून हल्ला करतो. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे या सापाची पक्ष्यासारखी चोच असते. तोंड लांबट चोचसारखे असते. सर्पमित्र आशिक नैताम, रोशन नैताम, राहुल शिवरकर, संदीप शेंडे, कमलेश जाधव यांना हा साप रावणवाडी येथे आढळला.
सर्पमित्रानुसार हा साप भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदा मिळाला आहे. या अगोदर साकोली नागझिरा येथे मिळालेला होता. सर्पमित्रांमधे कुतूहलाचा विषय आहे. याबाबत माहिती बनवून वनविभागाला स्वाधीन करून सापाला रावणवाडीच्या जंगलात सोडण्यात येणार आहे.