सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. येथे एक लाख २५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ असून सुमारे पाचशे वैयक्तिक नळजोडण्यांद्वारे गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो.
सध्या सुरू असलेल्या विरली (बु.) ते ईटान रस्ता बांधकामांतर्गत या रस्त्यावरील छोटेखानी पुलांचे बांधकाम सुरू आहे. आता या रस्त्याचे रुंदीकरण झाले असून, रस्त्याच्या कडेने असलेली पाईपलाईन पुलाच्या बांधकामामुळे फुटली आहे. परिणामी या पाईपलाईनला यू टर्न देऊन पाईपलाईनची पुन्हा जोडणी करावी लागत आहे. मात्र, ही यू टर्न देऊन केलेली जोडणी पाईपलाईनमधील पाण्याच्या दाबापुढे टिकत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार पाईपलाईन सटकत आहे. त्यामुळे या पाईपलाईनची दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हात टेकले असून स्थानिक प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. या रस्त्यावर अशा प्रकारच्या एकूण सात पुलांचे बांधकाम प्रस्तावित असून भविष्यात अशी समस्या पुन्हा निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्राम प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याची गरज आहे.
पाईपलाईनच्या सदर समस्येमुळे येथील नळांना गत तीन दिवसांपासून पाणी येत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. येथे ११ हातपंप आहेत. मात्र, त्यांपैकी काही हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे चांगले पाणी येत असलेल्या हातपंपांवर महिलांची बेसुमार गर्दी होत असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांमध्ये भांडणे होत आहेत. काही नागरिक गावाशेजारच्या शेतातील मोटारपंपांवरून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. त्याचप्रमाणे येथील काही शेतकऱ्यांवर गुरांसाठी ट्रॅक्टरने पाणी आणण्याची वेळ आली आहे.
कोट
विरली (बु.) ते ईटान रस्ताबांधकामात पाणीपुरवठा योजनेची सुमारे ४० मीटर पाईपलाईन फुटली. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सायंकाळपर्यंत गावकऱ्यांना नळांद्वारे पाणी मिळेल.
लोकेश भेंडारकर, सरपंच, विरली (बु.)