भंडारा : जैववैविधतेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात हेमिडाक्टाइलस ट्रायसर कुटुंबातील दुर्मीळ गेको सरडा आढळून आल्याने वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. लाखनी तालुक्यातील गोंडसावरी येथील एका शेतात हा गेको सरडा आढळून आला असून याची नोंद सातपुडा फाउंडेशनने घेतली आहे.
सातपुडा फाउंडेशनचे सहायक संवर्धक अधिकारी बंडू उईके यांनी गोंडसावरी येथील मंगर तुमसरे यांच्या शेतात या सरड्याची नोंद घेतली. सरडे संवर्धनासाठी काम करणारे तज्ज्ञ डॉ. वरदगिरी यांच्या मते हेमिडाक्टाइलस कुटुंबात १६१ प्रजाती आहेत. लाखनी येथे आढळलेला गेको सरडा अत्यंत दुर्मीळ आहे. त्याची जास्तीत जास्त लांबी सात इंच असते. अंगावर काळे व पांढरे ठिपके असते. त्यामुळे तो सुंदर दिसतो. इतर सर्व गेकोप्रमाणेच याच्यामध्येही शेपूट टाकण्याची क्षमता असते. ती पुन्हा वाढते. गेको प्रामुख्याने विविध प्रकारचे कीटक जसे क्रिटेल, बिटल आणि दिमक खातात. त्यांची घरे दगडाखाली किंवा खड्ड्यांमध्ये असतात.
गेको सरड्याचे संवर्धन आवश्यक
गेको सरड्याची प्रजाती सामान्यत: पेंचमध्ये आढळते; परंतु ती निशाचर असल्याने तिच्या अधिवासावर आणि प्रजननावर फारसे संशोधन झाले नाही. या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, असे डॉ. वरदगिरी यांनी सांगितले.