लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील सासरा, सानगडी संयुक्त किसान समितीच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात कृषिपंपांना अखंडित १० तास वीजपुरवठा व्हावा व इतर मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बसस्थानकाच्या चौकात जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संयुक्त किसान समितीचे अध्यक्ष किशोर बारस्कर होते. सभेत शैलेश गणवीर, राजू बडोले, राजेश पोवनकर, भाऊराव गोटेफोडे, विनायक नंदरधन, भास्कर ईटवले, हंसराज नगरकर, चंद्रशेखर गायधने, गोपाल पोवनकर, प्रकाश गोटेफोडे, अरुण गोटेफोडे यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर बसस्टँड चौकात प्रतीकात्मक रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनानंतर शिवमंदिर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, साकोलीचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर शिंदे, डोंगरगाव डीसीचे साहाय्यक अभियंता अजय गेडाम व लेखापाल नंदकिशोर शहारे यांनी आंदोलनात सहभागी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक दिवशी चक्राकार पद्धतीने आठ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येईल. काही कारणांमुळे वीज खंडित झाल्यास तेवढी वेळ वाढवून देण्यात येईल. सभेचे संचालन व झालेल्या सामूहिक चर्चेनंतर जगदीश ईटवले यांनी आभार प्रदर्शन केले. १५ दिवसांत सर्व मागण्यांची व्यवस्थित पूर्तता झाली नाही तर साकोली येथील विद्युत कंपनीच्या विभागीय कार्यालयावर सानगडी ते साकोली असा पायी मार्च काढून बेमुदत उपोषण आंदोलन आंदोलन करण्यात येईल, याला जवाबदार शासन राहील, असा इशारा शिवकुमार गणवीर यांनी दिला.
अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे- थकीत वीज बिलामध्ये शासनाने दिलेल्या सवलतीचा फायदा शेतकऱ्याने घेऊन त्यांची खंडित केलेली वीज जोडून देण्यात येईल. मीटर जळण्याच्या कारणांची माहिती घेऊन नैसर्गिकरीत्या जळलेले मीटर विनामूल्य लावून देण्यात येतील. यापुढे रीडिंगप्रमाणे बिल देण्यात येतील व आतापर्यंत दिलेल्या सरासरी बिलामध्ये दुरुस्ती करून देण्यात येईल. डीपीच्या व लाईनच्या देखभालीचे काम निर्धारित वेळेवरच करण्यात येतील व शासनाच्या नवीन योजनेप्रमाणे शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्याला नवीन वीज कनेक्शन देण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आता आश्वासनाची पूर्ततेकडे सानगडी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.