वसतिगृहातील स्नेहसंमेलन : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादनभंडारा : विद्यार्थीनींनी शालेय जीवनात आपले ध्येय निश्चित करावे, ध्येय गाठतांना अपयश आले तरीही न डगमगता प्रयत्न करत रहावे, कारण अपयशातूनच यशाचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड, सहाय्यक धर्मदाय आयुक्त जयश्री पुणावाला, सहाय्यक आयुक्त देवसूदन धारगावे उपस्थित होते. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह भंडारा, साकोली, लाखांदूर, पवनी तसेच राजेदहेगाव येथील अनुसूचित जाती, नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा येथील विद्यार्थींनींचा यामध्ये सहभाग होता. यावेळी धारगावे यांनी समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून विद्यार्थींनीने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थींनीमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. जयश्री पुनावाला यांनी आधुनिक युगात वावरतांना विद्यार्थींनीनी राष्ट्रपुरुषांचा आदर्श डोळयापुढे ठेवावा, असे आवाहन केले. यावेळी शालेय विद्यार्थींनीनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रांगोळी स्पर्धा, शैक्षणिक साहित्य व कला प्रदर्शनी, संगीत खुर्ची , ड्राप बॉल गेम, हंडीफोड, समुहगीत स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, फॅशन शो, नृत्य व वादविवाद स्पर्धा यामध्ये सहभाग घेतला. यावेळी प्रथम, द्वितीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थींनीना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी परिक्षक म्हणून जयश्री सातोकर, प्रा.डॉ. हेमंत देशमुख, प्रा. डॉ. गुणवंत धात्रक, अंजली चिवंडे यांनी परिक्षण केले. संचालन गजाम यांनी केले तर पराग वासनीकर यांनी आभार मानले. (नगर प्रतिनिधी)
अपयशातून यशाचे ध्येय गाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2016 12:57 AM