चरण वाघमारे : प्रकरण पोलिसांकडून बदनामीचे षडयंत्रभंडारा : नगर परिषदेच्या उपाध्यक्षा कविता भोंगाडे यांच्या कुटुंबीयासोबत शहर पोलिसांचे भांडण झाले. लोकप्रतिनिधी म्हणून आपण या घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी गेलो होतो. याचा अर्थ त्यांच्यावर कारवाई करु नका, असे आपण म्हटले नाही. तरीही शहर पोलिसांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात आपल्याविरुद्ध समाजात गैरसमज पसरविण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, यात आपण दोषी असल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी कुठल्याही चौकशीसाठी आपण तयार असल्याचे तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.यावेळी ते म्हणाले, आपण कुठल्याही चुकीच्या बाबीला समर्थन केलेले नाही. १३ सप्टेंबरला सहायक पोलीस निरीक्षक सुधिर वर्मा यांचे पालिका उपाध्यक्ष कविता भोंगाडे यांच्या कुटूंबीयांसोबत भांडण झाले. त्यानंतर हा प्रकार जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात शहरातील लोकांनी माझी निंदा केली, असा आरोप केला. पोलिस निरीक्षकांच्या पत्रकावर शहरातील काही संघटनांनी माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात दोषीविरुध्द कारवाई करावी, असे माझे म्हणने असतानाही पोलिसांकडून गैरसमज पसरविण्यात आला. प्रत्यक्ष मी, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हान व माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या संघटना घटनास्थळावर नव्हते तरीही या प्रकरणातील सत्य उघडकीस आणण्यासाठी या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी मी कोणत्याही चौकशीस समोर जाण्यास तयार, यात मी दोषी आढळून आल्यास माझी न्यायालयीन चौकशी करावी, असेही आमदार चरण वाघमारे यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)