लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तुमसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर यांनी पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे राजू कारेमोरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
खासदार प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक असलेले तुरकर यांना यावेळी उमेदवारीची अपेक्षा होती. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी राजू कारेमोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळीही डावलण्यात आल्याने त्यांनी पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी त्यांनी स्थानिक सभागृहात कार्यकर्त्यासोबत बैठक घेतली. आता पुढच्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी ४८ अर्जाची उचलजिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागांसाठी २२ ऑक्टोबरपासून नामांकन भरणे सुरू झाले आहे. शुक्रवारी भंडारा विधानसभा क्षेत्रासाठी २१, साकोली मध्ये १८, तुमसर मध्ये ९ अर्ज असे एकूण ४८ अर्ज उचलण्यात आले. २९ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
तुमसर मध्ये दोन नामांकन दाखलभंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि साकोली या तीन विधानसभा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी शुक्रवारी तुमसर विधानसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर, अन्य दोन मतदारसंघात एकही नामांकन दाखल झाले नाही. शुक्रवारी दाखल झालेल्या दोन नामांकनासह जिल्ह्यात आतापर्यंत नामांकन दाखल केलेल्यांची संख्या ४ झाली आहे. तुमसर मध्ये शुक्रवारी अपक्ष धनेंद्र तुरकर तसेच बसपाचे उमेदवार यादवराव बोरकर यांनी निवडणूक अधिकारी दर्शन निकाळजे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. साकोलीत गुरुवारी आमदार नाना पटोले यांनी काँग्रेसच्या वतीने तर अशोक पटले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. भंडारा विधानसभेसाठी अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.