जवाहरनगर : समाजाची जबाबदारी काय असते, हे जर व्यक्तीला कळले, तर ध्येय साध्य करायला सोपे जाते. यासाठी प्रत्येकाने आपले कार्य जबाबदारीने करायला पाहिजे. ते कोरोना युद्धात आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासनाने योग्यरीत्या पार पाडले. त्यामुळे ते सत्कारास पात्र ठरले आहेत, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. भंडारा पंचायत समितीअंतर्गत संत ज्ञानेश्वर सभागृहात मंजूर घरकुलांचे प्रमाणपत्र वाटप व कोरोना योद्ध्यांच्या सत्कारप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी नूतन सावंत, विस्तार अधिकारी भीमगिरी बोदेले, शिवसेना तालुका उपाध्यक्ष अनिल गायधने, सरपंच मोरेश्वर गजभिये, राजेश सार्वे, संजय आकरे, भोपे, कोथुर्णा, खोकरला, सावरी, गणेशपूर येथील सरपंच उपस्थित होते.
तहसीलदार अक्षय पोयाम म्हणाले की, घरकुल बांधकामाकरिता अतिक्रमणधारकांनी लागणारे जमिनीचे निस्तारपत्रक करून, आपले घरकुल यशस्वीरीत्या बांधकाम करावे. यासाठी शासन आपणास नियमानुसार सहकार्य करणार. गटविकास अधिकारी नूतन सावन म्हणाले की, कोविड-१९ यादरम्यान आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी व पोलीस विभागांनी जे कार्य केले आहे, ते कौतुकास पात्र आहेत. भंडारा पंचायत समितीअंतर्गत ३,८०० घरकुलाचे उद्दिष्ट दिले आहे. ते पूर्ण करावयाचे आहे. त्याकरिता सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. याप्रसंगी कोथुर्णा, खोकरला, ठाणा, सावरी, गणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांचा सत्कार शाल व श्रीफळ प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. संचालन नरेश बोपचे यांनी केले, तर आभार शहापूरचे सरपंच मोरेश्वर गजभिये यांनी मानले. यशस्वीतेसाठी नरेश लांजेवार, नरेश झलके, सुरेश तिजारे, गणेश माथनकर, गज्जू कारेमोरे, रमेश माकडे, सौरभ घाटोळे, नीलेश मोथरकर, नीलेश घाटोळे, शैलेश मोथरकर, राहुल ठाकरे, जयंत बुधे, जगन वाघमारे, पंकज लांबट, शरद धांडे, प्रभू हटवार, दीपाली आकरे, फुलन सर्वे, दिशा ठाकरे, सुषमा पवार यांनी सहकार्य केले.