गत दोन वर्षांपासून लोहारा, जांब, परिसरात शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मार्च महिन्यांपासून शेतकरी संकटात आहे. लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्ण चौपट झाली आहे. या संकटातून मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता नवीन संकट मानगुटीवर बसले असल्याचा प्रत्यय या परिसरात आलेला आहे . उभ्या धान पिकांची तणस झाली. काही प्रमाणात पीक शिल्लक होते . या धान पिकावर विविध रोगाने ताव मारण्यास सुरुवात केली . धान पीक कापणीच्या तोंडावर असताना मोठा आघात मावा तुडतुडा रोगाने दिला आहे . हातात येणारे पीक जाताना उघड्या डोळ्यांनी पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत . परंतु काहीच करता येत नाहीत. शासन अंतर्गत मदतीची अपेक्षा आहे. याच परिसरात मावा तुडतुडा रोगाने उभे धान पीक नष्ट केले होते.
शेतकऱ्यांचे घरात एक पोती धान आले नाही. तुमसर तालुक्यातील लोहारा, सोरणा, लंजेरा, रोंघा, आंबागड, लेंडेझरी तर मोहाडी तालुक्यातील जांब, ताळगाव, धोप, कांद्री, हिवरा, धुसाळा, सकरला आदी गावात चार एकरात पाच ते सहा पोते धान होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी देशोधडीला लागत आहे. भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. साधारणतः एक लाख ६० हजार हेक्टरवर यंदा धानाची लागवड करण्यात आली. निसर्गाचा मारा झेलत धान बहरला. मात्रा ऐन कापणीच्या वेळेस धानावर तुडतड्याने आक्रमण केले. अख्खे शेत तुडतुड्याने फस्त केले . त्यामुळे धान उत्पादनात रिकार्ड तोड घट झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पिक विमा देण्याची मागणी लोहारा, जांब, कांद्री, धोप, ताळगाव तसेच तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.