भंडारा : संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात आता लसीकरणाला वेग आला असून नागरिक स्वयंस्फूर्तीने लसीकरण करण्यासाठी पुढे येत आहेत. गुरुवारी १९ हजार २३२ व्यक्तींनी लस घेतली असून त्यात सर्वाधिक १७ हजार ७४२ व्यक्ती ग्रामीण भागातील आहेत.
कोरोनाची दुसरी लाट अनुभवल्यानंतरही ग्रामीण भागात लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अनेक गैरसमजुतीमुळे नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नव्हते. मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने प्रभावीपणे जनजागृती केली. परिणामी आता लसीकरणाला वेग आला आहे. आता जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने लसीकरण मोहीम वेगवान केली आहे. गुरुवारी तर आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढून लसीकरण झाले. एकाच दिवशी तब्बल १९ हजार २३२ व्यक्तींनी लसीकरण केले. त्यात शहरी भागातील १४९० ग्रामीण भागात १७ हजार ७४२ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. भंडारा तालुक्यात ३०८२, मोहाडी २४९२, तुमसर ४०५९, लाखनी ३२८२, साकोली २०१२, लाखांदूर १९१४ आणि पवनी २३११ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.
बाॅक्स
ग्रामीणमध्ये १७ हजार ७४२ व्यक्तींचे लसीकरण
गुरुवारी ग्रामीण भागात १७ हजार ७४२ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्यात भंडारा २६८८, मोहाडी २३५८, तुमसर ३६५३, लाखनी ३११५, साकोली १८०४, लाखांदूर १९०४ आणि पवनी २१६० व्यक्तींनी लसीकरण केले. ग्रामीण भागात नागरिकांमध्ये असलेला लसीकरणाचा गैरसमज दूर करण्यात यश आल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येते.