भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गत महिन्यात ६५ टक्क्यांपर्यंत खाली आलेला रिकव्हरी रेट सोमवारी ९४.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात २३३८ क्रियाशिल रुग्ण आहेत. सोमवारी ७२२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या, तर ७४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आणि पाचजणांचा कोरोनाने बळी घेतला.
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. दररोज सरासरी १२०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढली होती. बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते. परंतु, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वेगाने कमी व्हायला लागली. त्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले. प्रशासनासह भयभीत झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला.
सोमवारी जिल्ह्यात ५६१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात २६, मोहाडी १, तुमसर ३, पवनी ८, लाखनी १९, साकोली ३ आणि लाखांदूर तालुक्यात १४ असे ७४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत.
पाचजणांचा मृत्यू झाला असून त्यात भंडारा तालुक्यातील ५१ वर्षीय महिला, मोहाडी तालुक्यातील ७२ वर्षीय महिला आणि लाखनी तालुक्यातील ५७ वर्षीय महिला यांचा जिल्हा रुग्णालयातील कोविड वाॅर्डात, तर तुमसर तालुक्यातील ७० वर्षीय महिला आणि साकोली तालुक्यातील ७८ वर्षीय पुरुषाचा भंडारा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ३४६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ५३ हजार ९८३ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून, १०२५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात २३३८ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
५३ हजार ९८३ व्यक्तींची कोरोनावर मात
जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार ९८३ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. त्यात भंडारा तालुक्यातील २२ हजार ९८७, मोहाडी ४०२८, तुमसर ६५९४, पवनी ५६२९, लाखनी ५९७०, साकोली ६१५७ आणि लाखांदूर तालुक्यातील २६१८ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून, सध्या भंडारा तालुक्यात ६५४, मोहाडी १०३, तुमसर २५०, पवनी १७३, लाखनी ३०६, साकोली ७२१ आणि लाखांदूर तालुक्यात १३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.