लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन शेतीच्या हंगामात पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने पेट्रोल डिझेलचे दर त्वरित कमी करावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशारा भारिप बहूजन महासंघ भंडारा जिल्हाशाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.जून महिन्यापासून शेतकऱ्यांची खरीप हंगामाची वेळ असते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकूवत असताना ऐन हंगामाच्या वेळेस पेट्रोल डिझेलचे दर वाढवून शेतकऱ्यांचे व सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहेत. ६ जून पासून दररोज ६० ते ७० पैसे प्रती लिटरमागे पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले जात आहे. या १८ दिवसांच्या कालाावधीत प्रती लिटर ७ ते ८ रुपये एवढी वाढ झालेली असून पुन्हा दररोजच दरवाढ केली जात आहे. महिन्याभरात दहा रुपये प्रतीलिटर दरवाढ होणार तर नाही ना! अशी भीती निर्माण झाली आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांजवळ रक्कम नसल्याने कर्ज काढून शेती कसत आहेत. बँका वेळेवर कर्ज देत नाही. धान बियाण्यांची किंमत वाढविण्यात आली आहे. रासायनीक खते, किटकनाशकचे दर गगणाला भिडले आहे. एक प्रकारे शेतकऱ्यांची लुटमार होत आहे.शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भारिपचे जिल्हा महासचिव दीपक गजभिये, उपाध्यक्ष लक्ष्मण तिरपुडे, नरेंद्र बन्सोड, भिमराव बन्सोड, भंडारा तालुकाध्यक्ष सुखदेवे, शहराध्यक्ष शैलेश राहूल, कार्तिक तिरपुडे, महाविर घोडेश्वार, नागोराव खोब्रागडे आदी उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 5:00 AM