केशोरी : येथे परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ऊन, पावसाच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे. मात्र रात्रीला या प्रवासी निवाऱ्याचा उपयोग दारुड्यांना होत असून, प्रवासी निवारा दारुड्यांचा अड्डा बनला आहे. निवाऱ्यात पडून असलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या याची साक्ष देत आहेत. यावरून गावात दारूशौकिनांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, तर प्रवासी निवाऱ्यात दारू पिणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाच्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाने प्रवाशांचा ऊन व पावसापासून बचाव होण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवासी निवारे तयार केले. त्यानुसार येथे आमदार विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे.
या प्रवासी निवाऱ्याच्या शेजारी अतिक्रमण करून काही व्यावसायिकांनी हॉटेल व दुकाने लावली आहेत. याचाच फायदा घेत रात्रीला प्रवाशांपेक्षा गावातील दारुड्यांची मैफल या प्रवासी निवाऱ्यात रंगत आहे. प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीजवळ जिकडे-तिकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असून, त्या दारुड्यांच्या पार्टीची साक्ष देत आहेत.
येथील रिकाम्या बाटल्या पाहून हा दारू पिण्याचा खेळ दररोज रात्री चालत असावा असे दिसून येत असून, तशी गावात चर्चा आहे. येथे बसून दारू पिणाऱ्यांवर वचक बसविणे गरजेचे आहे. अन्यथा तरुण मंडळी दारूच्या आहारी जाऊन आपल्या कुटुंबाची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.
याचीच काहीशी प्रचिती सध्याची प्रवासी निवाऱ्याची गत बघून दिसून येत आहे. यामुळे आता पोलिसांनीही याकडे गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे.
दारुड्यांवर कारवाईची मागणी
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या डिसेंबर १९९९ मधील गोळीबारकांडाचा उगम याच ठिकाणावरून झाला होता हे विशेष. त्यानंतर हे चित्र बघून गोळीबारकांडाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रवासी निवाऱ्यात बसून दारू पिणाऱ्यांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण होतो. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दखल घेऊन दारू पिणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.