: मोहगाव खंदान येथील प्रकार
रंजित चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : मोहगाव खंदान येथील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाकरिता वन विभागाच्या जागेतील पट्टे वाटप करण्यात आले असले तरी पांदण रस्ता बांधकामास वन विभागाने मंजुरी नाकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतअंतर्गत रस्ता बांधकामाकरिता आधी मंजुरी घेणारे पत्रच दिले नाही. अशी माहिती वन विभागाने दिली असून, शेतकऱ्यांचे आरोप फेटाळले आहेत. यामुळे शेतकरी विरोधात वन विभाग, असा प्रकार गावात निर्माण झाला आहे.
मोहगाव खंदान गावाच्या शेजारी असणाऱ्या गट क्रमांक ४७४/१ मधील जागेचे पट्टे गावातील नागरिकांना वाटप करण्यात आले आहेत. ही जागा कास्तकारी कामाकरिता इमारत व जळाऊ लकडांकरिता मुकरर करण्यात आल्याने वन हक्क कायद्यांतर्गत शेतीकरिता पट्टे देण्यात आले आहेत. या गट क्रमांकमध्ये ७५ हेक्टर आर जागा असून, ती वन विभागाच्या ताब्यात आहे. या जागेतील वन अधिनियम कलमअंतर्गत बाबूलाल जांभुरे, वंदना जांभुरे ०.४९ हेक्टर आर, श्रीकिशन कटरे, गीता कटरे २.२५ हेक्टर आर, परशराम कटरे, बिरनबाई कटरे १.४० हेक्टर आर, कलाबाई डडेमल, पूना डडेमल, ०.९२ हेक्टर आर, मारुती अडमाचे, सारका अडमाचे १.६९ हेक्टर आर जागेचे वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता जुन्या काळातील पांदण रस्ता आहे; परंतु या रस्त्यावर आजपावेतो मातीकाम झाले नाही. वन विभागाने या पांदण रस्त्याची कधी दुरुस्ती केली नाही. यामुळे रस्ता दुर्लक्षित झाला आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पट्टे देण्यात आले असले तरीही शेतात ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने ग्रामपंचायतअंतर्गत रस्तादुरुस्तीकरिता नियोजन तयार करण्यात आले आहे. ग्रामसभेत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पांदण रस्त्याच्या मातीकामाला मंजुरी देण्यात आली आहे; परंतु मातीकाम करताना वन विभागाची रीतसर मंजुरी घेण्यात आली नाही. ग्रामपंचायतअंतर्गत तसे पत्र देण्यात आले नाही. असे कारण पुढे करीत पांदण रस्त्याच्या मातीकामाला वन विभागाने मंजुरी नाकारली आहे. सातबारा दस्तऐवजात सरकार वन विभाग, अशी नोंद आहे. ७५ एकर जागा असून, पैकी जागेचे वाटप करण्यात आले आहे. संपूर्ण जागेचे पट्टे वाटप करण्यात आले नाहीत. यामुळे निम्म्याहून अधिक जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. हा गट क्रमांक आधी राखीव वन क्षेत्रात नसल्याने पट्टे वाटप करण्यात आले आहेत. सुधारित आदेशानुसार संपूर्ण गट क्रमांक राखीव वनात असल्याने पांदण रस्त्याचे मातीकाम करताना वन विभागाची मंजुरी आवश्यक असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे; परंतु पट्टेधारक शेतकरी ऐकायला तयार नाहीत. पट्ट्यांतर्गत मिळालेल्या शेतीत शेतकरी उत्पादन घेत आहेत. त्यांना पावसाळ्यात नादुरुस्त रस्त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पांदण रस्ते बांधकामाला वन विभागाने मंजुरी देण्याची मागणी होत आहे.
मोहगाव खंदान येथील गट क्रमांक ४७४/१ मधील जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. या जागेतील पट्टे वाटप करण्यात आले असले तरी पांदण रस्त्याचे मातीकाम करताना वन विभागाची मंजुरी घेण्यात आली नाही. सदर गट क्रमांक राखीव जागेत येत आहे. यामुळे सरसकट कोणत्याही कामांना मंजुरी देता येत नाही.
-टी.एन. कावळे, राउंड ऑफिसर तुमसर
मोहगाव खंदान येथील पट्टेधारकांना जमिनीचे हस्तांतरण झाले असले तरी शेतशिवारात ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वन विभागाने समन्वयातून सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.
-श्रीकिशन कटरे, जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, भंडारा