भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या माता मानसिक धक्क्यातून सावरल्या नाहीत. या मातांची नियमित तपासणी आणि समुपदेशन करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी दिले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांशी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसुंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या दृष्टीने न्यायवैद्यक तज्ज्ञांची चमू, इलेक्ट्रिकल निरीक्षक, व्हीएनआयटी व अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केल्याचे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या माता अद्यापही मानसिक धक्क्यातून सावरल्या नाहीत. त्या ओल्या बाळंतीणी आहेत. त्यामुळे त्यांची नियमित आरोग्य तपासणी आणि समुपदेशन करण्याचे निर्देश देण्यात आले. मातांची घरपोच आरोग्य तपासणी डाॅक्टरांनी करावी व दैनंदिन अहवाल आशांमार्फत आपल्याला कळवावा, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचेही त्यांनी निर्देश दिले. यशोमती ठाकूर यांनी मृत बालकांच्या माता योगीता धुळसे (श्रीनगर) आणि वंदना सिडाम (रावणवाडी) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत सांत्वन केले. मातांच्या आरोग्याविषयी कोणतीही हयगय होता कामा नये. मातांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची स्पष्ट सूचना त्यांनी दिली.