लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकातील चुलबंद खोऱ्यातील धानाचा हंगाम समाधानकारक आहे. थोड्याफार प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. शेतकरी राजा नियंत्रणाकरिता फवारणी करीत आहे; मात्र पावसाचा व्यत्यय येत असल्याने फवारणी लांबणीवर जात आहे. वातावरणाने साथ दिल्यास चुलबंद खोऱ्यातील हलक्या धानाचा हंगाम पंधरा दिवसात कापणीला येऊ शकतो.
बॉक्स
परतीच्या मान्सूनची भीती!
मान्सूनने जून, जुलै महिन्यात अपेक्षित हजेरी लावलेली नाही. ऑगस्ट महिन्यात तर अत्यल्प हजेरी लावली. जलसाठे अपेक्षित भरलेले नाहीत. बरेच जलसाठे रिकामी आहेत. परतीचा मान्सून २२ सप्टेंबरनंतर येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हा अंदाज खोटा ठरून परतीचा मान्सून लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गतवर्षाला सुद्धा परतीच्या मान्सूनने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. पुन्हा तेच तर होणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षीसारखा ओला दुष्काळ होऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे.
बॉक्स
आधारभूत केंद्र ऑक्टोबरमध्ये सुरू करा.
भंडारा जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हलक्या धानाचा हंगाम हाती येण्याची संपूर्ण शक्यता आहे. शासन व प्रशासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रांना वेळेत परवानगी देत सुरू करण्याची नितांत गरज आहे. अल्पभूधारक शेतकरी पैशाच्या अडचणीत असल्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून उमटत आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
जिल्ह्यातील खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा आहे. कित्येक शेतकरी याच हंगामावर वार्षिक नियोजन करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत केंद्राचा लाभ व्हावा. याकरिता लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांप्रती सहृदयता दाखवित हंगामाचा अभ्यास करीत ऑक्टोबरमध्ये धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.