गत ५० वर्षांपूर्वी आवळी या गावाचे तालुक्यातील इंदोरा येथे शासनाने पुनर्वसन करताना शेतजमिनिसह भूखंड देखील उपलब्ध केले आहेत. मात्र, उपलब्ध करण्यात आलेली शेतजमीन पीक घेण्यायोग्य नसल्याने या गावातील नागरिकांनी गत अनेक वर्षापासून जमिनीची सुधारणा करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून या जमिनीच्या सुधारणाविषयक कोणत्याच उपाययोजना न करण्यात आल्याने या गावातील नागरिक पुनर्वसित गावात जाण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे.
तथापि, दरवर्षी गावात वैनगंगा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याने सर्व कुटुंबांच्या घरांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शासनाला दरवर्षी पूरपीडितांना सहाय्यताअंतर्गत नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, यंदा पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीत पीडित कुटुंबांना शासनाद्वारे कुठलीही मदत किंवा नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याची नोटीस स्थानिक तलाठ्यामार्फत नागरिकांना देण्यात आली आहे.
यंदाचा पावसाळा सुरू होताच गत ५० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पुनर्वसनाअंतर्गत स्थानांतरणासाठी स्थानिक तलाठ्यामार्फत नोटीस बजावण्यात आल्याने महसूल प्रशासनाविरोधात नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे. या स्थितीत शासन, प्रशासनाने तत्काळ दखल घेत पावसाळ्याच्या तोंडावर आवळी निवासी नागरिकांना पुनर्वसित जागेवर स्थानांतरणाची नोटीस बजावणाऱ्या तलाठ्याविरोधात उचित कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
पावसाळ्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी केली गावाची पाहणी
वैनगंगा व चुलबंद नदीच्या वेढ्यात वसलेल्या आवळी गावात पावसाळ्यात निर्माण होणारी पूरपरिस्थिती व विविध समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गत २२ मे रोजी दुचाकीने आवळी गावात जाऊन विविध समस्यांवर नागरिकांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावालगतच्या वैनगंगा नदीपात्रासह गावातील प्राथमिक शाळा, पाणीपुरवठा योजना यासह अन्य शासन सुविधांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. दरम्यान, पूरपरिस्थितीत या गावातील शेतपिकांच्या हानीबद्दल देखील माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना पावसाळ्यात निर्माण पूरपरिस्थिती व पुनर्वसन संबंधाने विचारणा केली असता शासनाकडून विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने पुनर्वसन खोळंबल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
बॉक्स :
मूलभूत सुविधांपासून वंचित
चुलबंद व वैनगंगा नदीचा वेढा असलेल्या तालुक्यातील आवळी गावात नेहमीच पुराचा जबर फटका बसत असतो. या परिस्थितीत स्थानिक आवळी येथील नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी भर पुरातून डोंग्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो. एवढेच नव्हे तर या गावातील विद्यार्थी व नागरिक आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांपासून पावसाळ्यात वंचित राहतात.