लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा स्फोट झाला असून, दररोज हजार ते दीड हजार रुग्ण निघत आहे. रुग्णालयात खाटांची संख्या कमी आणि दररोज वाढते रुग्ण यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयातही गत आठवड्याभरापासून बेड मिळणे कठीण झाले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे नातेवाईक या रुग्णालयातून त्या रुग्णालयात केवळ बेडसाठी भटकंती करीत असल्याचे चित्र भंडारा शहरात दिसत आहे. एकदा बेड मिळाला तर ऑक्सिजनचीही मारामार होत असून, यात रुग्णाचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे मनोबल खचत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. भंडारा जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून कोरोना रुग्णांचा स्फोट होत आहे. मृतांचा आकडाही वाढत आहे. अशा स्थितीत संपूर्ण आरोग्य यंत्रणा टोकडी पडत असल्याचे जाणवत आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी १४८१ खाटांची सद्यस्थितीत सुविधा आहे. त्यात शासकीय रुग्णालयात ७४१ आणि खासगी रुग्णालयात ७४० खाटा आहेत. शासकीय रुग्णालयात तर सध्या एकही बेड खाली दिसत नाही. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डसह कोरोना वॉर्ड रुग्णांनी फुल्ल झाले आहे. पवनी, साकोली आणि तुमसर येथेही शासकीय रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत. अशीच अवस्था खासगी रुग्णालयांची आहे. खासगी रुग्णालयांची खाटाची क्षमता ७४० असून, तेथे सद्यस्थितीत ६९४ रुग्ण दाखल आहेत. एकीकडे खाटांची संख्या मर्यादित आणि दररोज हजार ते दीड हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यातील किमान २०० ते २५० व्यक्तींना रुग्णालयीन उपचाराची गरज असते. मात्र रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक गत आठ दिवसांपासून उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेत असल्याचे दिसत आहे. मात्र रुग्णालयात जागा नसल्याने अशा रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ आली आहे. प्रशासन विविध उपाय योजना करीत असली तरी रुग्णांची संख्या पाहता ती तोकडी ठरत आहे. यासाठी नागरिकांनीच संयम पाळण्याची गरज आहे.
ऑक्सिजनची मागणी वाढली पुरवठा अपुरा
भंडारा जिल्हा रुग्णालयाला सद्यस्थितीत दररोज ७०० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असली तरी जवळपास ७०० सिलिंडर रुग्णालयात येत आहेत. परंतु सध्याच्या स्थितीत हे सिलिंडर अपुरे पडत आहे. भंडारा येथे सनफ्लॅग कंपनी आणि नागपूर येथील रुख्मिणी तसेच भरतीया कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहे. प्रचंड मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन सिलिंडरचे वाहन रुग्णालयात पोहोचले की नातेवाइकांची गर्दी होत आहे.
आरटीपीसीआर चाचणीसाठी प्रतीक्षा जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून आरटीपीसीआर चाचणी अत्यल्प केली जात आहे. ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टर आरटीपीसीआर चाचणीचा सल्ला देतात. परंतु भंडारा जिल्ह्यात आता आरटीपीसीआर चाचणीसाठी कीटचा तुटवडा असल्याची माहिती आहे. त्यामुळेच केवळ शासकीय रुग्णालय आणि अल्पसंख्यांक वस्तिगृहातच आरटीपीसीआर चाचणी केली जाते. तेथेही पाच ते सहा तास रांगेत उभे रहावे लागते