एकीकडे खाटांची संख्या मर्यादित आणि दररोज हजार ते दीड हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यातील किमान २०० ते २५० व्यक्तींना रुग्णालयीन उपचाराची गरज असते. मात्र रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक गत आठ दिवसांपासून उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेत असल्याचे दिसत आहे. मात्र रुग्णालयात जागा नसल्याने अशा रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ आली आहे.
बॉक्स
ऑक्सिजनची मागणी वाढली पुरवठा अपुरा
भंडारा जिल्हा रुग्णालयाला सद्यस्थितीत दररोज ७०० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असली तरी जवळपास ७०० सिलिंडर रुग्णालयात येत आहेत. परंतु सध्याच्या स्थितीत हे सिलिंडर अपुरे पडत आहे. भंडारा येथे सनफ्लॅग कंपनी आणि नागपूर येथील रुख्मिणी तसेच भरतीया कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहे. प्रचंड मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन सिलिंडरचे वाहन रुग्णालयात पोहोचले की नातेवाइकांची गर्दी होत आहे.
बॉक्स
आरटीपीसीआर चाचणीसाठी प्रतीक्षा
जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून आरटीपीसीआर चाचणी अत्यल्प केली जात आहे. ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टर आरटीपीसीआर चाचणीचा सल्ला देतात. परंतु भंडारा जिल्ह्यात आता आरटीपीसीआर चाचणीसाठी कीटचा तुटवडा असल्याची माहिती आहे. त्यामुळेच केवळ शासकीय रुग्णालय आणि अल्पसंख्यांक वस्तिगृहातच आरटीपीसीआर चाचणी केली जाते. तेथेही पाच ते सहा तास रांगेत उभे रहावे लागत आहे. प्रशासनाने आरटीपीसीआर चाचण्या कमी केल्याचे दिसून येत आहे.