भंडारा : कोरोना या वैश्विक महामारीने जगाला त्रस्त करून सोडले असताना औषधांच्या काळाबाजारानेही नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. कोरोना उपचारात रेमडेसिविर या लसीचा वापर होत असल्याने अन्य राज्यातून या लसी मागवून तिचा काळाबाजार सुरू आहे. २,३६५ रुपयाला मिळणारी ही लस भंडारा जिल्ह्यात पाच ते नऊ हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. उल्लेखनिय म्हणजे या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे.
जिल्ह्यात २९ हजारांच्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारांच्यावर आहे. कोरोना आजारावरील औषधांचाही मोठा खप वाढला आहे. याचाच फायदा आता औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनी उचलला आहे. भंडारा जिल्ह्यात अन्य राज्यातून रेमडेसिविर या लसीचा पुरवठा करण्यात येत असून, चोरीछुपे मार्गाने या लसी भंडारा जिल्ह्यात आणल्या जात आहेत. सदर लसी जिल्ह्यातील दोन ठिकाणी गोपनीय पद्धतीने लपवून ठेवल्याची ही विश्वसनीय माहिती असताना औषध प्रशासन मात्र सावध भूमिका बाळगून आहेत. तक्रारच नाही तर कारवाई करायची कशी, असा उपरोधिक सवाल यात व्यक्त केला जात आहे. एकीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रुग्णांचे नातेवाईक या लसीसाठी हवे तेवढे पैसे मोजायला तयार आहेत; मात्र लस मिळणे दुरापास्त झाले आहे. विशेषतः गत आठवड्यातच या लसीसाठी लक्षावधी रुपयांची उलाढाल झाली; मात्र तक्रारच नाही तर कोणाला पार्टी बनवायचे, असा सूर व्यक्त करून औषध प्रशासन कारवाईसाठी धजावत आहे. गुप्त माहितीच्या आधारावर यात संबंधित विभाग लिप्त असल्यानेच कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येते.
बॉक्स
रेमडेसिविर इंजेक्शनचे मध्यप्रदेश कनेक्शन
कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर ही लस दिली पाहिजे, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत; परंतु विद्यमान स्थितीत ही लस मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक जिवाचा आटापिटा करीत आहेत. भंडारा जिल्ह्यात चोरी-छुप्या मार्गाने मध्य प्रदेश येथून ही लस आणल्याचे सांगितले जात आहे. विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. नियमांचा वापर करून या लसीचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करता आली असती; मात्र पाणी कुठेतरी मुरत असल्याची चर्चा खुद्द वैद्यकीय क्षेत्रात रंगली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा मध्यप्रदेश येथून होत असल्याने याचे थेट कनेक्शन औषधांचा चोरी-छुपा व्यापार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीशी तर नाही ना, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
कोट
मध्यप्रदेशातील लगतच्या जिल्ह्यातून लस आणून जिल्ह्यात विकत आहे, असे मी ऐकले आहे; पण लस कुठे व कुणाला विकण्यात आली, याबाबत माहिती नाही, तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे यासंदर्भात कुठलीही तक्रार अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाही. तक्रार नसल्याने जिल्ह्यात कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रार दिल्यास आम्ही हमखास कारवाई करू.
प्रशांत रामटेके, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन भंडारा