करडी(पालोरा) : कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या जखमी चितळावर औषधोपचार करीत सुखरूप जंगलात सोडल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास मुंढरी बुज येथे घडली.
रात्री दरम्यान गावाशेजारील शेतशिवारात चारा-पाण्याच्या शोधात आलेल्या चितळावर पहाटे गावातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी तो सैरावैरा पळत गावात शिरला. कुत्रे पाठलाग करत पाय व पोटावर घाव घालत असताना ग्रामस्थांनी कुत्र्यांना पळवून लावले. जखमी चितळाला नागरिकांनी पकडले. याची माहिती मिळताच सरपंच एकनाथ चौरागडे व ग्रामपंचायत सदस्य आशिष चौरागडे यांनी चितळाला घरी झाडाला बांधून ठेवले. चारापाणी आदींची व्यवस्था करीत तुमसर वनाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
वनाधिकारी अरविंद लुचे यांच्या मार्गदर्शनाखाली पालोरा बीटचे वनरक्षक हाके यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने करडी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून औषधोपचार करण्यात आले. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करीत नागरिकांच्या उपस्थितीत केसलवाडा जंगलात चितळाला सुखरूप सोडण्यात आले.