तुमसर : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणताही माणुसकीचा मोठा धर्म नाही असे बोलले जाते. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागातही सामाजिक भान म्हणून मोठ्या प्रमाणात पाणपोई उभारल्या जात होत्या. मात्र, काही वर्षापासून या सामाजिक कार्यात हातभार लावणाऱ्या सामाजिक संस्थांनी आखडता हात घेतल्याने तुमसरात जणू काही माणुसकीचा धर्मच आटल्याची प्रचिती येत आहे.
तहानलेल्यास घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य लाभावे, या उद्देशाने सेवाभावातून हे कार्य केले जायचे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्था व संघटना सामाजिक भान जपत दरवर्षी उन्हाळ्यात वाटसरूंसाठी पाणपोई सुरू करीत होत्या. त्यामुळे रस्त्यावरून जाणारी तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली की आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरवायचे. त्यानंतरच पुढचा मार्ग धरायचे. असे काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात शहरासह ग्रामीण भागात हे चित्र दृष्टीस पडायचे. आज मात्र अशा स्वरूपाचा कुठलाही उपक्रम सामाजिक सेवेच्या भावातून जपला जात नसल्याचे दिसत आहे. वास्तविक ग्रामस्थांची वा तहानलेल्या वाटसरूची तहान कमी झालेली नाही. परंतु, समाजातला सेवाभाव संपत चालल्याने आणि माणुसकीचा धर्म आटल्याने एकेकाळी तुमसर शहरात ठिकठिकाणी दिसणारी पाणपोईची वर्दळ तर सोडाच, पाणपोईची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची विकतचे पाणी पिण्याची परिस्थिती नसते. त्यामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी हॉटेल, चहाच्या टपरीचा आधार घेतात.
सेवाभाव या वृत्तीने ग्रामीण भागात बसस्थानकासह वर्दळीच्या ठिकाणी किंवा आपल्या घर व दुकानासमोर पाणपोई उभारतात. या ठिकाणी रस्त्यावरून जाणारी व्यक्ती आपसुकच पाणपोई दिसली की, क्षणभर विश्रांती घेऊन दोन घोट पाणी पिऊन नंतर पुढच्या मार्गाने प्रवासाला जायचे. काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात हे चित्र बहुतांश ठिकाणी दिसायचे. परंतु ग्रामीण व शहरी भागात पाणी पाजणे या पुण्याच्या कामाला अखेरची घरघर लागली आहे.
कोरोनाच्या सावटात आताच्या प्रखर उन्हाळ्यात येणाऱ्या, जाणाऱ्या वाटसरू, बेघर, भटक्या लोकांना उन्हाळ्यात थंड पाण्याने तहान भागविता यावी, काही वेळ निवांत बसून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवताचा मंडप घातलेल्या सावलीचा आसरा घेत उन्हाच्या दाहकतेने कोरडा झालेला घसा ओला करून तृष्णा तृप्ती करण्यासाठी पाणपोई उपयोगी होत्या. मात्र, अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वाटसरूंची तृष्णा भागविणाऱ्या पाणपोई कोरोना काळात हिरावल्या गेल्याचे दृश्य सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
कोरोनाचा संसर्ग व त्याची भीती यामुळे प्रवाशांनी आपल्या तृष्णेचा पर्यायही आता बाळगायला सुरुवात केली आहे. त्यात मोफत असलेली पाणी ही नैसर्गिक संपत्तीही सध्या बाॅटल बंद झाली व त्याचीच सध्या खरेदीही तहान भागविण्याचे मुख्य साधन बनले आहे.