संजय साठवणेलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : समृद्ध वृक्षवेलींनी नटलेल्या आणि जैवविविधतेत अव्वल असलेल्या नागझिरा अभयारण्यात हत्ती कॅम्प अस्तित्वात होता. ५१ वर्षे या जंगलात हत्तींचा कॅम्प होता. मात्र तीन वर्षांपूर्वी येथील कॅम्प गडचिरोली जिल्ह्यातील सिराेंचा वनविभागातील कमलापूर येथे हलविण्यात आला. येथे वास्तव्याला असलेल्या अनेक हत्तींच्या आठवणी आजही वनविभागात चर्चेला जातात. नवेगाव, नागझिरा जंगल पूर्वी खूप संपन्न होते. मध्यप्रदेशातून या भागात रानटी हत्ती यायचे. त्यावरूनच या भागात हत्तीखोज, हत्तीडोह, हत्तीमारा, हत्तीखोदरा, हाथीपागडी अशी नावे जंगल भागाला आहेत. यावरूनच या परिसरात हत्तींचे अस्तित्व होते. वनविभागाने १९६७ मध्ये वनविभागातील काम करण्यासाठी हत्ती कॅम्प सुरू केला. आसाममधून हरेलगज, मावी, मुक्तमाला, रूपा या हत्तींना आणण्यात आले. त्यापैकी केवळ रूपा जिवंत असून ती आता ७८ वर्षांची आहे. मात्र २६ मार्च २०१८ रोजी नागझिरा येथून हत्ती कॅम्प कमलापूर येथे स्थानांतरित करण्यात आला. आता येथे हत्ती नसले तरी हत्तींच्या आठवणी मात्र आजही वनविभागात चर्चेचा विषय असतो.
राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प - सिरोंचा वनविभागांतर्गत येणारा कमलापूर हा एकमेव हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी सध्या बसंती, मंगला, अजित, राणी, गणेश, प्रियंका आणि नागझिरातून गेलेली रूपा आहे. येथील जंगलात हत्तीसाठी पोषक वातावरण असल्याने तेथे हत्तींची संख्या वाढत आहे. परंतु प्रशिक्षित माहूत अद्यापही मिळाला नाही.
संस्कारित रूपा - नागझिरा अभयारण्यातून कमलापूरला गेलेली रूपा ही हत्तीण संस्कारित आहे. हत्तिणीवर व्ही. अप्पू पण्णीकर (केरळ), धर्मा धुर्वे आणि मूलचंद मसराम या माहुतांचा प्रभाव पडला होता. पीछे, बैठ, ट्रे, मल या शब्दावर करावयाच्या कृतीचा तिला अद्यापही विसर पडला नाही.
पुन्हा हत्ती कॅम्प उभारावानवेगाव नागझिरा जंगलात पूर्वी हत्तीचे वास्तव्य होते. हा भाग संपन्न होता. मात्र या जंगलाचे वैभव असलेला हत्तीकॅम्प आता येथून हलविण्यात आला. शासनाने पुन्हा हत्ती कॅम्प नागझिरा अभयारण्यात उभारावा, अशी अपेक्षा आहे.
-विनोद भावते, अरण्ययात्रा पुस्तकाचे लेखक.