तुमसर-देव्हाडी या पाच किमीच्या रस्त्याचे लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. रस्ता बांधकामाला आठ ते दहा महिने झाले. परंतु अजूनपर्यंत रस्ता दुभाजकात पथदिवे लावण्यात आले नाही. चार महिन्यापूर्वी काही अंतरापर्यंत पथदिवे लावण्यात आले होते, ते सुरूही झाले होते. परंतु ते पथदिवे काढण्यात आले. लावलेल्या पथदिव्यांचे खांब काही ठिकाणी वाकलेले होते, त्यामुळे धोक्याची अधिक शक्यता होती. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित विभागाने घेतली. परंतु त्यानंतर हे पथदिवे येथून नेण्यात आले.
या रस्त्यावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. राष्ट्रीय महामार्ग व तर शहराला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. हजारो प्रवाशांची ये-जा या रस्त्यावरून असते. रात्रीच्या सुमारास रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे रस्ता दुभाजकावर पथदिवे लावण्याची गरज आहे. पथदिवे लावण्याचे कंत्राट येथे दिले असल्याची माहिती आहे. परंतु अजूनपर्यंत पथदिवे का लावण्यात आले नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावर पथदिवे लावण्याची गरज आहे.