मृत विवाहितेच्या वडिलांचा आरोप
पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
लाखनी : जावयाचे दुसऱ्या एका युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याने तिच्याशी लग्न करता यावे, याकरिता मुलीला पैशाची मागणी व मारहाण करण्यात आली. तसेच अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने माझ्या मुलीचा काटा काढण्यात आला, असा आरोप मृत विवािहतेच्या वडिलांनी केला आहे. वनिता नीलकमल पारधीकर असे मृत विवाहितेचे नाव असून, वडील विक्रम रहांगडाले (६२) परसोडी यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी हुंडा मागणे व वनिताच्या मृत्यूस कारणीभूतप्रकरणी पती नीलकमल यशवंत पारधीकर, सासरा यशवंत सुखचंद पारधीकर व सासू अंतकला पारधीकर सर्व राहणार गुढरी/टोली तालुका साकोली यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
विक्रम भोजराम रहांगडाले परसोडी(केसलवाडा)ता.लाखनी यांची कन्या वनिता हिचे लग्न रीतीरिवाजानुसार विवाह यशवंत पारधीकर यांचा मुलगा नीलकमलसोबत पार पडला. वनिता ही ग्रामपंचायत चिचगाव/सराटी येथे डाटा एन्ट्री ऑपरेटरचे काम करीत होती. त्यांना दोन अपत्यही आहेत. गत दोन वर्षांपासून नीलकमल हा माझे मुलीला, जमीन खरेदी करावयाची असल्याने माहेरून पैसे आण म्हणून तकादा लावून नेहमीच मारपीट, मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप तक्रारीतून वडिलांनी केला आहे. तसेच सासू-सासरे जावयास उलटसुलट सांगून वनिताला मारण्यास प्रवृत्त करीत होते. या त्रासाबाबत वनिताने भ्रमणध्वनीवरून माहेरच्या मंडळींना माहिती दिली होती. याबाबत गुढरी येथे जाऊन चांगले वागण्याबाबत जावयास समजही देण्यात आली होती. मात्र नीलकमलच्या वागण्यात कसलाही फरक पडत नव्हता. नेहमीच्या कटकटीला कंटाळून मुलीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गुढरीकडे तक्रार दिली होती. व्यवस्थित वागण्याचे अटीवर पती-पत्नीत समझोता झाला होता. जावयाचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध असल्याने माझ्या मुलीला मारण्यात आले, असा आरोप व तशी तक्रार लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पतीसह सासू-सासऱ्यावर कलम ४९८ अ , ३०६ , ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांना प्रथम श्रेणी न्यायालय लाखनी येथे हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे यांच्या मार्गदर्शनात सपोनी म्हसकर, पोहवा भालेराव तपास करीत आहेत.
बॉक्स
काय झाले घटनेच्या दिवशी
घटनेच्या दोन दिवसापूर्वी पारधीकर कुटुंबात नातवाचा वाढदिवस होता. वनिताचे काका नारायण रहांगडाले कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी गेले असता नीलकमल हा क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाड घेऊन वनिताला मारण्यास धावला होता, असे सांगण्यात येते, अशी बाबही लाखनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. ११ फेब्रुवारी रोजी शेतावर असताना रहांगडाले यांना वनिताची प्रकृती बिघडल्याची व त्यानंतर ती दगावल्याची माहिती मिळाली. साकोलीतील उपजिल्हा रुग्णालयात गेले असता, वनिताच्या तोंडातून रक्त निघत होते तसेच पोटावर मारहाणीचे व्रण होते. यावेळी नीलकमल हा शवविच्छेदन करण्यास तयार नव्हता, असे सांगण्यात आले होते.