तुमसर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चुल्हाड ते सुकली नकुल या गावांना जोडणाऱ्या ३ किमीच्या रस्त्यावर दोन महिन्यांत खड्डेच खड्डे पडले असल्याने ते बुजविण्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नव्या-कोऱ्या डांबरीकरण रस्त्यावर महिन्याभरात देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली होती. यात निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप सुकली नकुल येथील गावकऱ्यांनी केला असून, पुन्हा नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.
चुल्हाड ते सुकली नकुल या गावांना जोडणाऱ्या ३ किमी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाकरिता १ कोटी ४७ लाख १६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. देवरी देव फाटा ते सुकली नकुल गावापर्यन्त खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. डांबरीकरणानंतर रस्त्याकडेला मुरूम घालण्यात आला नाही. परंतु रस्त्यावर मात्र दोन महिन्यात खड्डेच खड्डे पडला आहेत. तिरोडाच्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनला रस्त्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात आल्याने खड्डे पडले आहेत. नव्या कोऱ्या डांबरीकरण रस्त्यावर दोन महिन्यांत ट्रॅक्टरच्या वजनाने खड्डे पडले असल्याने गुणवत्तेवर गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. मुंबईच्या मंत्रालयात लागेबांधे असणाऱ्या कंपन्यांना ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्यासाठी कंत्राट देण्यात आले. दोन महिन्यांत रस्ते भकास झाले आहेत. निकृष्ट रस्ता डांबरीकरणावरून गावकरी आक्रमक झाले आहेत. खड्डे पडले असल्याने नव्याने पुन्हा डांबरीकरण करण्याची ओरड गावकऱ्यांनी सुरू केली आहे. एक नव्हे अनेक खड्डे असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत घालण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. कंत्राटदाराच्या निदर्शनास ही बाब लक्षात येताच निकृष्ट डांबरीकरण बांधकाम अंगलट येणार असल्याच्या भीतीने देखभाल व दुरुस्ती कालावधीच्या पहिल्याचदिवशी खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. ५ वर्षांपर्यंत रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची हमी त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनीने दिली आहे. रस्ता पूर्ण डांबरीकरण करण्यात आला नाही. रस्त्याकडेला मुरूम घालण्यात आला नाही. परंतु देखभाल आणि दुरुस्तीच्या कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.