सालेकसा : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषीविरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी एकदिवसीय धरणे आंदोलन व उपोषण करण्यात आले.
केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यांविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमेवर १०० पेक्षा जास्त दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. या कालावधीत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा देखावा केला आहे; पण हे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. तीन काळे कायदे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारे आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्याला मिळणारा हमीभाव, शेतकरी हक्काच्या बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. व्यापारी व उद्योजकांना शेतकऱ्यांची लूट करण्याची मुभा मिळणार आहे. म्हणूनच देशातील शेतकरी याविरोधात पेटून उठले आहेत. त्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकार जनतेची लूट करीत आहे. याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कांबळे यांना देण्यात आले.
शिष्टमंडळात जिल्हा महिला काँग्रेस प्रतिनिधी वंदना काळे, जिल्हा सचिव राजू काळे, तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव चुटे, माजी जि.प. सभापती लता दोनोडे, मनोज गजभिये, नितेश शिवणकर, डॉ. संजय देशमुख, नरेशकावरे, देवराज खोटेले, जितेंद्र बल्हारे, ओमप्रकाश लिल्हारे यांचा समावेश होता.