साकोली : वाटमारीच्या प्रकरणातून उघडकीस आलेल्या तांदूळ तस्करी प्रकरणाचा अहवाल पोलिसांना अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण कारवाई ठप्प झाली आहे. दुसरीकडे पुरवठा विभागाने साधी चौकशी केली नाही. यामुळे दलाल आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याची चर्चा आहे.
दोन आठवड्यांपूर्वी पळसगाव ते गोंडउमरी मार्गावर २२ लाख ५० हजारांची वाटमारी झाली होती. या वाटमारीत आठ जणांना अटकही करण्यात आली. त्यात परप्रांतीय तांदळाचे तस्करी प्रकरण पुढे आले. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान पोलिसांनी तांदळाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविला. मात्र, तब्बल १५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप अहवाल आला नाही. त्यामुळे पोलिसांची चौकशी थांबली आहे. यावरून तांदळाचे व्यापारी आणि पुरवठा विभाग यांचे साटेलोटे असल्याची चर्चा आहे.
भंडारा जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भंडारा जिल्ह्यातील तांदूळ इतर जिल्ह्यात पाठविण्यात येतो. मात्र, भंडारा जिल्ह्यातच तांदळावर अन्याय केला जात आहे. परप्रांतीय तांदळाची आयात करून जास्त पैसे लुटण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान तेलंगणाच्या तांदूळ व्यापाऱ्याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार तो व्यापारी साकोली पोलीस ठाण्यात आला होता. चौकशीदरम्यान त्याने तांदळाचे बिल पोलिसांना सादर केल्याची माहिती आहे. मात्र, हा परप्रांतीय तांदूळ महाराष्ट्रात आणून विकता येतो का, हा प्रश्न कायम आहे.
बाॅक्स
त्या तांदळाची सखोल चौकशी हवी
साकोली तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात तांदळाची तस्करी होत असल्याची माहिती आहे. हा तांदूळ महाराष्ट्रात कसा आणला? यात कोण आहे ? या सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागू शकते.