एप्रिल अखेर धरणाची पातळी २३७.२०० मीटरवरपवनी : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काही काम शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा रिकामे करण्यात येत आहे. एप्रिल अखेर हे धरण पूर्णत रिकामे केले जाणार आहे.गोसेखुर्द धरण बांधण्याच्या वेळेस धरणातील पाणी वाहून जाण्याकरिता पायथ्याजवळ चार भूमिगत बोगदे तयार करण्यात आले होते. या भूमिगत बोगद्यातून धरणातील तळाचे पाणी वाहून जात होते. धरण पूर्ण झाले असून मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण केला आहे. चारही भूमिगत बोगदे बंद करण्याचे काम तेवढे शिल्लक होते.यावर्षी गोसेखुर्द धरणामध्ये २४२ मीटरचा दुसरा टप्पा म्हणजेच २० टीएमसी पाणी साठविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी २४२.५०० मीटरपर्यंत पाणी साठविण्यात आले होते. परंतु चारही भूमिगत बोगदे बंद करावयाचे असल्यामुळे काही दिवसांपासून धरणातील पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडले जात आहे. सर्व बाबींचा विचार करून पाणी सोडले जात आहे. परंतु वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत नाही. त्यामुळे धरणातून सुरक्षितरित्या पाणी सोडले जात आहे. धरणाचे काम ३१ मेपर्यंत करावयाचे आहे. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होते. धरणातील पाण्याची पातळी २४२.५०० मीटरवरून कमी केली आहे. सद्यस्थितीत धरणातील पाण्याची पातळी कमी होऊन २३९.३०० मीटर झाली आहे. एप्रिल अखेरपर्यंत २३७.२०० मीटरपर्यंत पाण्याची पातळी कमी केली जाणार आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी होणार असल्यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावातील प्रकल्पग्रस्तांना आपले साहित्य काढण्याकरिता सोपे जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)
धरण रिकामे करण्याचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 12:29 AM