भंडारा : गत वर्षभरापूर्वी मुदतपूर्ण स्थानिक लाखांदूर नगर पंचायतीच्या आरक्षणाची १५ नोव्हेंबर रोजी नव्याने सोडत काढण्यात आली. गतवर्षीदेखील संभाव्य निवडणुका लक्षात घेता आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने सदर सोडत रद्द ठरवून नव्याने सोडतीचे निर्देश दिल्याने १५ नोव्हेंबर रोजी नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत काही इच्छुक उमेदवारांना फटका, तर काही प्रस्थापितांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर असे की, एकूण १७ प्रभाग असलेल्या लाखांदूर नगर पंचायतमधील गत शासन कार्यकाळ मागील वर्षी संपुष्टात आला होता. सदर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी गतवर्षी १० नोव्हेंबर रोजी तत्कालीन शासन निर्देशानुसार नगर पंचायतींच्या १७ प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. सदर सोडतीनुसार तत्काळ काही इच्छुकांनी मोर्चेबांधणीलादेखील प्रारंभ केला होता. मात्र, कोरोना संकटामुळे सदर निवडणुका लांबणीवर गेल्या असताना निवडणूक आयोगाने नगर पंचायतीच्या आरक्षणाची नव्याने सोडत काढण्याचे निर्देश दिल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे बोलले जात आहे. नव्या आरक्षणानुसार ९ प्रभागांत महिला राखीव असल्याने पुढील काळात होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत महिलाराज पाहावयास मिळणार असल्याची चर्चा आहे.
तथापि, या आरक्षण सोडतीत काही प्रभागांतर्गत प्रस्थापितांना नव्याने संधी उपलब्ध झाल्याने निवडणूकपूर्व तूर्तास तरी प्रस्थापितांच्या चेहाऱ्यावर हास्य फुलले असल्याची चर्चा आहे. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्थानिक लाखांदूर नगरपंचायतमध्ये नव्याने आरक्षण सोडत काढतेवेळी भंडारा येथील उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, मुख्याधिकारी सौरभ कावळेंसह तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे आहे आरक्षण
यावेळी काढण्यात आलेल्या सोडतीत प्रभाग १ - अनु. जाती, प्रभाग २ - सर्वसाधारण, प्रभाग ३- नामाप्र महिला, प्रभाग ४ - सर्वसाधारण, प्रभाग ५ - अनु.जाती महिला, प्रभाग ६- सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ - सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ - सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ - सर्वसाधारण, प्रभाग १० - सर्वसाधारण, प्रभाग ११ - नामाप्र महिला, प्रभाग १२ - सर्वसाधारण, प्रभाग १३ - सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ - सर्वसाधारण महिला, प्रभाग १५ - नामाप्र, प्रभाग १६ - नामाप्र व प्रभाग १७ - अनु. जाती महिला.