राजू बांते
मोहाडी : निवडणुकीनंतर काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या आरक्षणाचा अधिक लाभ महाविकास आघाडीला होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याची सत्यता सरपंच निवडणुकीनंतरच पडताळून बघता येणार आहे.
मोहाडी तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिक सरपंच बनणार असा दावा महाआघाडीतील नेत्यांनी केला आहे. कारण, आरक्षणाने तशी स्थिती निर्माण केली आहे. भाजपासमर्थित गावात ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेल्यांचे संख्याबळ अधिक असताना कमी संख्याबळ अन् महाआघाडी समर्थित एकच ग्रामपंचायत सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे भाजपा समर्थित गडाला मोठा हादरा बसला आहे. यात जांभोरा, खडकी, पाचगाव या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
खडकी येथे भाजपासमर्थित सदस्य ५ निवडून आले तर महाविकास आघाडीचे ४ सदस्य निवडून आले. त्या चारमध्ये एकच पुरुष अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा तो सदस्य बिनविरोध निवडून येणार आहे. तसेच जांभोरा येथे भाजपासमर्थित ११ सदस्य संख्यांपैकी ७ सदस्य निवडून येवून बहुमत मिळविले, पण इथेही महाविकास आघाडीमधील ४ सदस्यांमध्ये एकच महिला सदस्य अनुसूचित जातीमधील निवडून आलेली आहे. त्यामुळे त्या बिनविरोध सरपंच बनतील. पाचगाव मध्येही आरक्षणाने तीच स्थिती निर्माण केली. तिथे भाजपासमर्थित ९ पैकी ६ सदस्य निवडून येवूनही ३ संख्याबळ असणाऱ्या महाविकास आघाडीमधील एक सदस्य सरपंच बिनविरोध निवडला जाणार आहे. संख्याबळ असतानाही भाजपासमर्थित सदस्यांना सरपंच बनता येणार नाही. पिंपळगाव झंझाड, मांडेसर,पारडी, दहेगाव, केसलवाडा, भिकारखेडा, सालई खुर्द, ताडगाव ,कान्हळगाव येथे महाविकास आघाडी समर्थित १२ सदस्य सरपंच बनतील तसेच या संख्येत वाढ होईल, असा दावा त्यांच्या नेत्यांनी केला आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांचा दावा किती खरा आहे, त्याची वास्तविकता सरपंच पदाच्या निवडणुकीनंतरच कळून येणार आहे.
बॉक्स
सहा महिला बनतील सरपंच
सतरा ग्रामपंचायतमध्ये सहा महिला सरपंचपदावर आरूढ होणार आहेत. यात जांभोरा, सालई खुर्द, केसलवाडा,पिंपळगाव का, पारडी, देव्हाडा बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात कोणत्या महिलांचे नशीब उजळणार हे लवकरच दिसणार आहे.