गाेपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्कसाकाेली (भंंडारा) : भाजपच्या ‘अब की बार चारसाै पार’ या संकल्पाची धास्ती घेत विराेधकांनी संविधान बदलण्यासाठी, आरक्षण रद्द करण्यासाठी भाजपला ४०० पार जायचे आहे, असा अपप्रचार सुरू केला आहे. ताे सपशेल खाेटा असून भाजप सत्तेत असेपर्यंत आरक्षण हटविणार नाही आणि हटवू पण देणार नाही. ही माेदींची गॅरंटी आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे दिली.
साकाेली येथे प्रचारसभेत शाह म्हणाले, सलग दाेन वेळा भाजपला बहुमत मिळाले, पण या बहुमताचा वापर आम्ही संविधान बदलण्यासाठी नव्हे तर ट्रिपल तलाक संपविण्यासाठी केला. काँग्रेसच्या काळात काश्मीरमध्ये तिरंगा फडकू शकला नाही. काँग्रसने ३७० कलम हे अनाैरस मुलासारखे कडेवर वाढवले. ते संपविण्यासाठी आम्ही बहुमताचा वापर केला, हे राहुल गांधींनी लक्षात घ्यावे. काँग्रेस संविधान व बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून मते मागत आहे. मात्र, याच काँग्रेसने १९५२ व १९५४ मध्ये बाबासाहेबांचा पराभव केला. १ रुपया आणि मिठाची पुडी असे मतदारांना वाटप करत काँग्रेसने त्यांचा पराभव केला व त्यानंतरही बाबासाहेबांचा सतत अपमान केल्याचा आरोप शाह यांनी केला.