भंडारा : कोरोना आपत्कालीन परिस्थितीत अनेक सरकारी अधिकारी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत. अशातच अनेक विभागांतील शासकीय, अधिकारी कर्मचारी यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. मात्र अनेक दवाखान्यात फिरूनही बेड उपलब्ध होत नाही. पर्यायाने त्यांना उपचारासाठी जिल्हास्तरावर अथवा नागपूरला धावपळ करावी लागते. मात्र त्या ठिकाणीही बेड, ऑक्सिजन मिळवण्यासाठी कुटुंबीयांना मोठा संघर्ष करावा लागतो. अशातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटना टाळण्यासाठी कर्तव्य निभावणाऱ्या कृषी विभाग, महसूल, वनविभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोविड रुग्णालयांमध्ये १० टक्के बेड आरक्षित ठेवावे, अशी मागणी जिल्ह्यातील शासकीय, अधिकारी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. याकडे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संदर्भातील कर्तव्य निभावताना अनेक ठिकाणी लेखी आदेश न देता तोंडी कर्तव्याचे काही ठिकाणी सांगण्यात येत आहे. दुुर्दैवाने कोविड कर्तव्य बजावताना एखाद्या कर्मचार्याला जीव गमवावा लागला तर शासनाने जाहीर केलेली ५० लाख रुपयांची कोविड सुरक्षा विमा कवच रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणार नाही. त्यानंतर मदतीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. शासकीय कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवूनही कुटुंबीयांना मदतीचा लाभ मिळत नाही, यासाठी कोविड कर्तव्य निभावणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेखी आदेश देऊनच कर्तव्यावर पाठविण्यात यावे, अशीही मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. यापूर्वी कोरोना संकटात जीव धोक्यात घालून काम करताना जिल्ह्यातील ग्रामसेवक, कृषी कर्मचारी, रोजगारसेवक, पोलीस कर्मचारी यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी मात्र अद्यापही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे.
बॉक्स
सर्वाधिक मृत्यू कृषी कर्मचाऱ्यांचे
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेत वर्षभरापासून कृषी कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहेत. मात्र तरीदेखील कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीसाठी आजही प्रतीक्षाच करावी लागत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून कर्तव्य निभावताना जिल्ह्यात आजपर्यंत ७ ते ८ कृषी कर्मचाऱ्यांना महिनाभरात आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोन कृषी पर्यवेक्षक, दोन कृषी सहायक तर एका वाहनचालकाचा, भंडारा तालुक्यातील एक अनुरेखक व तुमसर, मोहाडी तालुक्यातील एक कृषी पर्यवेक्षक, तर एका कृषी सहायकाचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच अवघ्या ३५ वर्षीय एका कृषी सहायकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र तरी आजही सर्व कृषी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस मिळालेले नाही ही खऱ्या अर्थाने शोकांतिकाच म्हणावी लागेल.