गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या आणि ५०० कोटी रुपयांवर ठेवी असलेल्या भंडारा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पाच संचालकांनी गुरूवारी अध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. यापूर्वी दोन संचालकांनी राजिनामे दिल्याने आणि चार संचालक अपात्र ठरल्याने १९ संचालक मंडळ असलेल्या या बँकेतील राजकारण आता अस्थिर झाले आहे.
राजीनामे देणाऱ्या संचालकांमध्ये माजी अध्यक्ष महेश जैन, उपाध्यक्ष हिराजी बांगडकर, लिलाधर वाडीभस्मे, कविता लांजेवार आणि गोपीचंद थवानी यांचा समावेश आहे. कायदेशिर बाबींसाठी वकिलांच्या फीजवर अतिरिक्त खर्च झाल्याचे कारण दर्शवून या संचालकांनी हे राजीनामे दिले आहे.
दरम्यान, १९ संचालक असलेल्या या बँकेतील राजकारण मागील तीन वर्षांपासून ढवळून निघाले आहे. जून २०१५ मध्ये हे संचालक मंडळ सत्तेवर आले होते. त्यांचा कार्यकाळ जून २०२० ला संपला असूनही कोरोना संक्रमणामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. २०२० मध्ये तत्कालिन अध्यक्ष महेश जैन यांचा राजीनामा घेऊन नाना पंचबुद्धे यांना अध्यक्ष बनविण्यात आले होते.
दरम्यानच्या घडामोडीत, २०२० मध्ये चिंतामण मेहरे आणि ॲड. विलास काटेखाये यांनी राजीनामा दिला होता. तर, ॲड. जयंत वैरागडे, रामदास शहारे, दिनेश गिऱ्हेपुंजे आणि ज्योती बावणकर यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अपात्र ठरविण्यात आले होते. सध्या संचालक मंडळात आठच संचालक राहिल्याने ही बँकच अल्पमतात आली आहे.