मुख्यमंत्र्यांना निवेदन : ५०० अर्ज केले सादरलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी शहरच्या वतीने लाखनी नगर पंचायतमार्फत घरकुल योजना सुरु करावी, या प्रमुख मागणीकरिता शुक्रवार रोजी जयस्तंभ चौक ते तहसील कार्यालय लाखनी येथे आंदोलन करण्यात आले. प्रमुख मागणीचे निवेदन व गरजू नागरिकांचे ५०० अर्ज शिष्टमंडळाद्वारे नायब तहसीलदार घरगडे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कारेमोरे, लाखनी नगर पंचायत उपाध्यक्ष धनु व्यास, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील नशीने, तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुणवंत दिघोरे, महिला तालुकाच्या उर्मिला आगाशे, ज्येष्ठ युवा नेते बाळा शिवणकर यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तहसील कार्यलयासमोर आंदोलनाचे सभेत रूपांतर करण्यात आले. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी सभेला मार्गदर्शन केले. याप्रसंगी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सभेतमागील १०-१२ वर्षांपासून लाखनी येथील गोर-गरीब व गरजू लोकांना आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही. अनेकांची घरे अत्यंत जीर्ण व जुनी झालेली आहेत. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व बेताची असल्यामुळे घर बांधू शकत नाहीत. अनेक कुटुंबांना गवताच्या व त्रिपालीच्या झोपडीत राहावे लागत आहे. तर अनेकांचे संसार उघड्यावर सुरु आहेत. प्रधानमंत्री यांनी सुरु केलेल्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाखनी नगर पंचायत क्षेत्रातील गरजू व गरीब लोकांना घरकुल मंजूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात लाखनी शहर युवक अध्यक्ष दिनेश निर्वाण, विनोद आगलावे, प्रशांत चचाने, अजय नान्हे, विजय चाचेरे, आकाश गहरवार, राजन तितिरमारे, रामकिशोर गिऱ्हेपुंजे, नाना मोहनकर, गोपाल गायधनी, सुभाष खंडाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी शहरचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
घरकुलासाठी राकाँंचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 12:26 AM