सीईओ पुलकुंडवार यांचे आवाहन : संत गाडगेबाबा पालखीचा स्वागत सोहळा थाटातगोंदिया : उघड्यावर शौचास गेल्याने मानहानी होते. विष्ठा जनावरांच्या पायाने घरात येते. त्यामुळे आजार बळावतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. १९५३ ला ग्रामगिता प्रसिद्ध झाली. सकाळी सगळ्यांनी उठले पाहिजे. केरकचरा गावाच्या बाहेर टाकला पाहिजे. आपली विष्ठा ही इतरांना दिसता कामा नये, असे प्रबोधन राष्ट्रसंतानी केले. त्यांचे विचार अंगिकारून आपण सर्वांनी तीन दिवसांत शौचालय बनवून त्याचा वापर करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.गोरेगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे संत गाडगेबाबा स्वच्छता पालखीचा स्वागत सोहळा राधाकृष्ण मंदिर परिसरात पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे, विस्तार अधिकारी ए.के. गिऱ्हेपुंजे, ग्रामसेवक आर.एन. बहेकार, राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष मारोती नेवारे, सचिव खुमेंद्र धमगाये, बुधराम चिंधीमेश्राम उपस्थित होते. महिलांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, जिथे महिला शक्ती एकत्र येथे तिथे कुणाचेही काहीच चालत नाही. महिलांनी स्वत:हून अभियानात सहभागी झाले पाहिजे. आपल्या गावातला एकही माणूस उघड्यावर जाणार नाही. याची काळजी महिलांनी घेतली पाहिजे. एका व्यक्तीला चहाचा खर्च दोन हजार तर गुटख्याचा खर्च चार हजार रुपये येतो. त्यासाठी आपण खर्चही करतो. परंतु घरात शौचालय बनवत नाही, ही खेदाची बाब आहे. उघड्यावरील हागणदारीमुळे आपले सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले असून आपल्या घरचा पाहुणचार देखील स्वच्छ आणि सुरक्षित नाही. उघड्यावर शौचास बसणे मानहानीकारक असून शौचालयासाठी आता शासन १२ हजार रुपये देत आहे.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरात शौचालय बनविण्याचा या संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी सोहळ्याच्या निमित्ताने संकल्प करण्याचे देखील ते म्हणाले. संत गाडगेबाबा यांच्या पालखीला पुष्प अर्पण करुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख, गटविकास अधिकारी डी.बी. हरिणखेडे यांनी पालखीचे स्वागत केले. दरम्यान राधाकृष्ण मंदिर परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालन करून आभार समाजशास्त्रज्ञ दिशा मेश्राम यांनी मानले.याप्रसंगी गणखैरा येथील सांस्कृतिक कला निकेतनच्या कलापथकाने कार्यक्रम सादर करुन जनजागृती केली. प्रत्येक गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या भजनी मंडळाने भजन सादर करुन पालखीच्या स्वागत सोहळ्यात चांगलाच जोश भरला.पालखीसाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनात माहिती शिक्षण संवाद तज्ञ अतुल गजभिये, राजेश उखळकर, क्षमता बांधणी तज्ज्ञ देवानंद बोपचे, शालेय स्वच्छता तज्ञ भागचंद रहांगडाले, स्वच्छतातज्ञ सूर्यकांत रहमतकर, मनुष्यबळ विकास तज्ञ तृप्ती साकुरे, सनियंत्रण आणि मुल्यमापन तज्ञ शोभा फटींग, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तज्ञ बाळकृष्ण पटले, संनियत्रण व मुल्यमापन तज्ञ विशाल मेश्राम, सर्व तालुक्यातील गटसंसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) ३८ ग्रामपंचायतीत स्वच्छता पालखीचे स्वागतगडचिरोली जिल्ह्यातून मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात दाखल झालेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता पालखीचे स्वागत जिल्ह्यातील पाच तालुक्यातील गौरनगर, बोरी, आसोली, कोरंभीटोला, अरुणनगर, खामखुर्रा, तावशी खुर्द, अर्जुनी, कुंभीटोला, बाराभाटी, येरंडी देव, देवलगाव, नवेगावबांध, परसोडी (रयत), खोबा, कोकणा (जमी.), कनेरी राम, कोहमारा, वडेगाव, परसोडी, खजरी, डव्वा, पळसगाव, भुसारीटोला, पाटेकुर्रा, मुरदोली, मुंडीपार, हिरडामाली, तुमखेडा, कारंजा, फुलचूरटोला, कुडवा, मुंडीपार, डोंगरगाव, काचेवानी, खैरबोडी, बिर्सी आणि पांजरा येथील गावकऱ्यांनी दर्शन घेवून केले.
शौचालयाचा संकल्प करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 12:38 AM