लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील रहिवासी गुलाब नामदेव लोणारे यांचा गेल्या दोन वर्षांपासून पेन्शनसाठी संघर्ष सुरू आहे. या सेवानिवृत्त शिक्षकाला अखेरच्या टप्प्यातही पेन्शनसाठी आजही संघर्ष करावा लागतो आहे. १९८६ मध्ये अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. ३० एप्रिल २००१ ते २००३ या कालावधीत डीएड प्रशिक्षित न झाल्याने त्यांची मान्यता पुन्हा रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ३१ डिसेंबर २००३ रोजी डीएड केले. त्यांना पुन्हा मान्यता मिळाली. कायमस्वरुपी शिक्षकपदी नियुक्त झाले. त्यानंतर ३० डिसेंबर २०१९ रोजी लोणारे लाखांदूर येथील शिवाजी प्राथमिक शाळेतून निवृत्त झाले. शाळेमार्फत आपला प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवला. मात्र, काही त्रुटी असल्याचे कारण दाखवून शिक्षण विभागाकडून त्यांची पेन्शन नाकारण्यात आली. लोणारे यांनी संस्थेकडे सेवा पुस्तिकेत नोंदी करून त्यानुसार प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली. मात्र, नोंदीसाठी वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप आहे. लोणारे यांनी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी १४ सप्टेंबर २०१९ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून लोणारे यांची पेन्शन तत्काळ तयार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, तरीही लोणारे यांना न्याय मिळाला नाही.
शिक्षण विभाग आतातरी न्याय देणार काय?- कुडेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक गुलाब लोणारे हे २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर शाळेने प्रस्ताव तयार करून शिक्षण विभागाकडे पाठवला. मात्र, तत्काळ या प्रस्तावातील त्रुटी न दाखवता व संस्थापक, मुख्याध्यापकांना योग्य समज न दिल्यानेच माझी पेन्शन वेळेत सुरू झाली नसल्याचा आरोपही लोणारी यांनी केला आहे. लोणारे यांच्या सेवा पुस्तिकेत २००४ ते २००६ च्या नोंदी केलेल्या नाहीत. मात्र त्यानंतर मग सेवा सातत्य कसे कायम राखले, त्यांची त्यानंतरची सेवा कशी झाली, याची वरिष्ठांकडून त्यावेळी ही चौकशी करण्यात आली नाही. वेगवेगळ्या शाळेत विविध अधिकाऱ्यांच्या भेटी होऊन आजपर्यंत सेवा पुस्तक व अन्य गोष्टींबाबत कधीही चौकशी झाली नसल्याची खंत लोणारे यांनी व्यक्त केली आहे.- नागपुरच्या शिक्षण उपसंचालकांनी गुलाब लोणारे यांची पेंशन तात्काळ मंजूर करण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्राची अंमलबजावणी करुन तात्काळ मला न्याय द्यावा असे सेवानिवृत्त शिक्षक गुलाब लोणारे यांची मागणी आहे.
मी ३० डिसेंबर २०१९ ला लाखांदूर येथील शिवाजी प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त झालो. याला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र अजुनही माझी पेंशन मंजूर झाली नसल्याने माझ्यासह माझ्या कुटुंबातील नऊ सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानंतरही पेंशन मंजूर होत नसेल तर आता न्याय कुणाकडे मागायचा. -गुलाब लोणारे, सेवानिवृत्त शिक्षक, कुडेगावमी कुणाकडेही पैशाची मागणी केलेली नाही. लोणारे हे संस्थेच्या विनापरवानगीने शिवाजी प्राथमिक शाळा लाखांदुरला बदलून गेले होते. त्यांच्या बाबतीत शिक्षणाधिकाऱ्यांसमोर दोघांचेही बोलणे झाले आहे. त्यांनी डिसीपीएस आणि पेंशन अशा दोन्ही गोष्टीला अर्ज केला होता. त्यांची नियुक्ती २००७ ला झाली आहे. त्यामुळे तसे कागदपत्र उपलब्ध नाहीत.-नरेश मेश्राम, संस्थापक, नरेश शिक्षण संस्था कुडेगाव