भंडारा : जूनच्या शेवटच्या व जुलै महिन्यात कधी कधी तो धरतीवर प्रकटला (पडला). मात्र, त्याच्या परतण्याने समाधान झाले नाही. दरम्यान जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कुटुंब पुरता हतबल झाला होता. त्यांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ‘त्याच्या’ बेपत्ता होण्याने सर्वांवरच संकट कोसळणार होते. सर्वच चिंतातूर असताना, शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ‘तो’ परतला. त्यामुळे चिंताग्रस्त चेहऱ्यावर समाधान झळकले. ‘तो’ म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून, ‘वरूणराजा’ होता.पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पऱ्हे, आवत्या व पेरणी आटोपती घेण्यासाठी घाई केली. दरम्यान, अनेकांनी पीक पेरणी केली तर काहींनी रोवणी आटोपती घेतली. त्यानंतर पावसाने दडी मारली. जूनच्या २२ तारखेला गायब झालेला पाऊस जुलैच्या दोन, तीन तारखेला पडला. त्यानंतर तो दहा, अकरा जुलैला परतला.यादरम्यान पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची पेरणी व भात पीक पूर्णत: धोक्यात आली. पावसाअभावी जिल्ह्यातील ९० टक्के पेरणी तर ९९ टक्के रोवणी खोळंबल्याचे वास्तव आहे. रोवणी व पेरणी खोळंबल्याने शेतकऱ्यांची पावसाकडे नजरा खिळल्या होत्या. अचानक गायब झालेल्या पावसाची शेतकरी चातक पक्षाप्रमाणे वाट बघत होता. शनिवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ढग दाटून आले व धो-धो पावसाला सुरूवात झाली. रात्री सात वाजेपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने पिकांना नवसंजिवनी मिळाली आहे. (शहर प्रतिनिधी)
‘तो’ परतल्याने चेहऱ्यावर झळकले समाधान
By admin | Published: July 19, 2015 12:37 AM