रेतीचे चार ट्रॅक्टर जप्त
मोहाडी : तालुक्यातील मुंढरी बुज. रेती घाटावर महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाही करून अवैध रेती व्यवसाय करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर कार्यवाही करून त्या ट्रॅक्टरना करडी पोलीस ठाणे येथे जप्त करून ठेवण्यात आले आहे.
तालुक्यातील मुंढरी (बूज.), देवाडा (बूज)., निलज (बूज.), ढिवरवाडा या रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू आहे. शनिवारी येथील नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे यांनी पोलिसांच्या मदतीने मुंढरी बूज. रेती घाटावर छापा टाकला असता तेथे आठ ते दहा ट्रॅक्टर अवैधपणे रेतीची चोरी करीत असताना आढळले. परंतु, तहसीलदारांना बघून पाच ते सहा ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले, तर चार ट्रॅक्टर पकडण्यात तहसीलदार व पोलिसांना यश आले. गौरीशंकर सुखदेव गोमासे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॉली तिथेच सोडून ट्रॅक्टर इंजिन घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला, तर ओमप्रकाश लक्ष्मण सोनवणे, सुरेश अशोक शेंडे, पितांबर ऊर्फ प्रमोद ठवकर, सर्व राहणार मुंढरी बुज. यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एक ब्रास अवैध रेती आढळल्याने या ट्रॅक्टर ना करडी पोलीस ठाणे येथे जमा करून ठेवण्यात आले आहे, तर गौरीशंकर गोमासे यांच्या रेती भरलेल्या ट्रॉलीला दुसरे ट्रॅक्टर इंजिन लावून पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. मुंढरी रेती घाटावर जाण्या येण्याकरिता दोन रस्ते आहेत. जर अधिकारी एका बाजूने आले तर रेती चोरटे दुसऱ्या रस्त्याने पळून जाण्यात यशस्वी होतात. नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, तलाठी प्रवीण साटकर, सहायक पोलीस निरीक्षक उईके, व ड्रायव्हर चंदू बावणे यांच्या चमूने कारवाई करून चारही ट्रॅक्टर मालकावर दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे रेती चोरट्यांमध्ये धडकी भरलेली आहे. सध्या देव्हाडा, निलज आणि ढिवरवाडा या रेती घाटावर रेती चोरट्यांच्या अक्षरश: धुमाकूळ सुरू असून, अशीच कारवाई या रेती घाटावरसुद्धा करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.