साकाेली तालुक्यात २२ लाख ५० हजार रुपयांची वाटमारी झाली आणि तेथून तांदूळ तस्करीचे बिंग फुटले. भाताचे काेठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा आणि गाेंदिया जिल्ह्यांतच तांदळाची चाेरटी आयात केली जाते. यामागचे खरे अर्थकारण आता हळूहळू पुढे येऊ लागले आहे. रेशनच्या धान्याची काळ्याबाजारात माेठ्या प्रमाणात विक्री केली जाते. लाभार्थ्यांना अत्यल्प दरात धान्याचा पुरवठा हाेताे. त्यात तांदळाचाही समावेश आहे. अनेकजण हा तांदूळ विकतात; परंतु यापेक्षाही अनेक रेशन दुकानदारही तांदळाच्या काळाबाजारात सहभागी आहेत. आलेला माल नाममात्र वितरित करून उर्वरित तांदूळ तस्करांच्या घशात घातला जाताे. भंडारा जिल्ह्यातील वाटमारीने तांदूळ तस्करी पुढे आली. मात्र याचे सर्व धागेदाेरे तेलंगणातून अण्णांच्या हाती आहे. विदर्भातून गेलेला तांदूळ पुन्हा राईस मिलर्सच्या माध्यमातून शासनाच्या गाेदामापर्यंत पाेहाेचविला जाताे. भंडारा जिल्ह्यात राेज साधारणत: २० ते २५ तांदळाचे ट्रक तेलंगणातून बिनधास्त येतात. वाटेत काेणतीही अडचण आली की, पैशाच्या बळावर ती साेडविली जाते. त्यामुळे आतापर्यंत हा प्रकार बिनबाेभाटपणे सुरू आहे. काेणताही अधिकारी यात कारवाई करताना दिसत नाही. उलट तांदळाची आयात करण्यास मनाई नसल्याचे सांगतात. मात्र आयात हाेणारा तांदूळ नेमका काेणता आहे, ताे कुठे जाताे याचा कुणीही शाेध घेत नाही. व्यापाऱ्यांचा तांदूळ असेल तर आयात-निर्यातीचा प्रश्नच नाही; परंतु चाेरट्या मार्गाने हा तांदूळ पुन्हा शासनाच्या गाेदामाकडे जात असेल तर त्याकडे कारवाई का नाही, अशा प्रश्न केला जात आहे.
शासकीय यंत्रणेतील अनेकजण या तांदूळ तस्करीत सहभागी असून त्यामुळे काेणतीही कारवाई हाेत नाही. साकाेली येथे गुन्हा दाखल असून पाेलिसांनी तांदूळ तस्करीच्या दिशेने तपास सुरू केला. तेव्हा त्यांच्यावर दबाव येत असल्याची माहिती आहे. यासाेबतच अण्णासाेबत अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचीही चर्चा साकाेलीत आहे.
बाॅक्स
कापसाची बाजारपेठ, तस्करीचे मुख्य केंद्र
तेलंगणा राज्यातील अदिलाबाद हे कापसाच्या व्यापाऱ्यासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. एकाधिकार याेजना असताना माेठ्या प्रमाणात कापूस चाेरट्या मार्गाने विदर्भातून अदिलाबादला जात हाेता. आता अदिलाबाद हे तांदूळ तस्करीचे केंद्र झाले आहे. विदर्भातील तांदूळ खरेदी करून त्या ठिकाणी साठविला जाताे आणि संधी मिळताच पुन्हा ताे भंडारा-गाेंदिया जिल्ह्यांच्या माध्यमातून शासनाच्या गाेदामात पाेहाेचताे. यात काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेत आहे.
बाॅक्स
तस्करांचे नेटवर्क गावागावांत
तांदूळ खरेदी करणाऱ्या तस्करांचे नेटवर्क गावागावांत आहे. गरजवंतांकडून तांदूळ खरेदी करण्यासाेबतच स्वस्त धान्य दुकानदारांनाही या तस्करांनी गळाला लावले आहे. अगदी कमी किमतीत तांदूळ खरेदी करून ताे पुन्हा शासनाच्या गाेदामापर्यंत पाेहाेचविण्याची किमया ही तस्कर मंडळी लीलया पार पाडतात.