भंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम सर्वच व्यवसायांवर दिसून येत आहे. अनेक व्यवसाय आता पूर्वपदावर येत असले तरीही रिक्षा व्यावसायिक अद्यापही कर्जाच्या संकटातून सावरलेले नाहीत. रिक्षाचालकांना कधी एक, तर कधी दोनच प्रवासी मिळतात. त्यामुळे त्याच दोन प्रवाशांना घेऊन कधी बसस्थानक, तर कधी गांधी चौक, वरठी रेल्वे स्टेशनवर लेफ्ट, राइट करीत रिक्षाचालक सारख्या फेऱ्या मारतात. किमान पाच प्रवासी मिळेपर्यंत तरी रिक्षाचालक वरठीवरून भंडाऱ्याला येत नसल्याने प्रवासी संतापतात. त्यातच एसटी महामंडळाने ग्रामीण बसफेऱ्या कमी केल्याने प्रवासी नाइलाजास्तव रिक्षामध्ये बसतात. मात्र, वाढलेले डिझेलचे दर, तसेच पूर्वीप्रमाणे प्रवासी वाहतूक सुरू नसल्याने रिक्षाचालक दिवसभर प्रवाशांची पळवापळवी करतानाचे चित्र बसस्थानक परिसरात दिसून येते.
बॉक्स
याठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी...
भंडारा बसस्थानक परिसरात तर बाराही महिने प्रवाशांची पळवापळवी सुरू असते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वेळेवर बसफेऱ्या नसल्याने अनेक खाजगी वाहनधारक बसस्थानकात घुसून प्रवाशांच्या शोधात असतात.
वरठी रेल्वेस्थानकात प्रवाशांना नेहमीच रिक्षाचालकांच्या मनमानीचा सामना करावा लागतो. अर्धाअर्धा तास रिक्षाचालक प्रवाशांना ताटकळत थांबून ठेवतात, तर कधी सात-आठ प्रवासी रिक्षात कोंबून धोकादायक पद्धतीने रिक्षा पळवितात.
राष्ट्रीय महामार्गावर त्रिमूर्ती चौकात खाजगी वाहनधारक हे प्रवाशांच्या प्रतीक्षेत दिसतात. दररोज येथे प्रवासी मिळविण्यासाठी जणूकाही वाहनधारकांची स्पर्धाच लागल्याचे चित्र अनेकदा दिसून येते.
कोट
प्रवाशांना त्रास
खाजगी वाहनांतून प्रवास करताना अनेकदा जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. यावर पोलिसांचा अंकुश असणे गरजेचे आहे. कधीकधी हे वाहनधारक हुज्जतही घालतात.
पल्लवी खोब्रागडे, प्रवासी
मी कॉलेजच्या कामासाठी नेहमीच भंडाऱ्याला जाते. मात्र, ग्रामीण भागात एसटी अजूनही येत नसल्याने मला खाजगी रिक्षानेच भंडाऱ्याला जावे लागते. प्रवासी मिळेपर्यंत तासन्तास ऑटोमध्येच बसून राहावे लागते.
बॉक्स
मनमानी भाडे ...
भंडारा ते ठाणे पेट्रोल पंपापर्यंत सुरुवातीला पंधरा रुपये घेतले जायचे. मात्र, आता वीस रुपये घेतले जातात. त्यासोबत लाखणी ते भंडारा या मार्गावरही वाहनधारक प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारतात. वरठी ते भंडाऱ्याला पूर्वी वीस रुपये तिकीट होते. मात्र, आता डिझेल महागल्याने ३० रुपये खाजगी रिक्षा चालक प्रवाशांकडून वसूल करतात. भंडारा शहरातील बसस्थानक ते तुकडोजी वाॅर्डपर्यंत ८० रुपये घेतले जात आहेत.