शेतकरी संककात : मनाई आदेशामुळे जिल्हा बँकेची कोंडी भंडारा : जिल्हा बँकेला ५०० व १००० हजार रूपयांच्या नोटा न स्वीकारण्याच्या आदेशामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याची स्थिी उदभवली आहे. घरातील जुन्या नोटा कुठे ठेवायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्हा बँकांच्या सर्व शाखांमध्ये जुन्या नोटांचे व्यवहार बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रिझर्व्ह बँकेच्यात त्या निर्णयाविरूद्ध असंतोष पसरला आहे.भंडारा जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात सात तालुक्यात ४६ शाखा आहेत. यात ७६ हजार शेतकऱ्यांनी अल्पमुदतीसाठी कर्ज घेतले असून ७० टक्के शेतकरी जिल्हा बँकेचे सदस्य आहेत. गावागावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यांच्यासमोर जिल्हा बँकेशिवाय अन्य पर्याय नाही. खत खरेदी वा मजुराला पैसे देण्याचा व्यवहार शेतकरी रोखीने करीत असतो. चलनातून नोटा बंद झाल्यानंतर चार दिवसापर्यंत मनाई आदेश नसल्यामुळे जिल्हा बँकेत ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यात आले होते. या चार दिवसात ४० कोटी रूपयांवर रक्कम जमा झाली. परंतु या नोटाबंदीमुळे हा व्यवहार चार लाखांवर घसरला आहे. या निर्णयापूर्वी जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमधून दिवसाकाठी दैनंदिन व्यवहार कोटीवर रूपयांवर होता. हा व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर थांबविण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयामुळे शेतकरी व शेतमजूर अडचणीत सापडला असून धान विकलेल्या रोख रकमेचे काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लोकांच्या रांगाच रांगा आजही दिसत आहेत. या बँकांमध्ये शेतकऱ्यांचे खाते नसल्यामुळे ते राष्ट्रीय बँकांमध्ये जात नाहीत. जुना नोटा स्वीकारण्यास मनाई करणारा आदेश रिझर्व्ह बँकेने मागे घ्यावा, अशी मागणी सहकार क्षेत्रातील जाणकार सुनिल फुंडे यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडणार !५०० आणि १००० रूपयांच्या चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला मनाई केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर संकटात आले आहेत. या आदेशामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. घरातील जुन्या नोटा कुठे ठेवायच्या, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. पतसंस्थांमध्ये ‘चलनकोंडी’ केल्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो पतसंस्था अडचणीत आलेल्या आहेत.जुन्या नोटांनी कर्ज कसे भरणार?रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, जिल्हा बँकेने मंगळवारपासून जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. भंडारा जिल्हा बँकेत १,०५२ कोटींच्या ठेवी असून ७१६ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. सोमवारपर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास दोन कोटींचे कर्ज भरले आणि ३६ कोटी जुन्या नोटांचा भरणा केला. मनाई आदेशामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्यांना मार्चपर्यंत बिनाव्याजी कर्ज भरण्याची मुदत आहे. परंतु मार्चपर्यंत द्यावे लागणाऱ्या व्याजाचा नाहक भुर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. हा नाहक भुर्दंड बसू नये, असे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक संजय बरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षाचसलग आठव्या दिवशीही पाचशे रूपयांच्या नवीन नोटा बँकांना प्राप्त न झाल्यामुळे अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन हजार रूपयांच्या नवीन नोटांचे वाटप विविध बँकानी केले. या नोटांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गर्दी होत असून एटीएममध्येही रांगा सुरूच आहेत.५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आर्थिक व्यवहार कोलमडला आहे. एका दिवसांत एटीएममधून अडीच हजार रूपयेच काढता येत असल्यामुळे व बँकेतून एका व्यक्तीला केवळ साडेचार हजारांच्याच नोटा बदलून मिळत असल्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. किरकोळ व्यापारी पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा स्वीकारायला नकार देत असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. १००, ५० रूपयांच्या नोटांचे महत्त्व वाढल्यामुळे या नोटांचे चलन वाढले आहे. सकाळपासूनच बँकांमध्ये ५०० व १००० रूपयांच्या जुन्या नोटा परत करुन नवीन चलनाच्या नोटा मिळविण्यासाठी बँकेत नागरिकांच्या रांगा आहेत. आजही विविध बॅकांचे एटीएम केंद्र बंद असून अनेक एटीएम केंद्रामध्ये ५०० रुपयांची नवीन नोट न पोहोचल्याने १०० रूपयांच्या नोटांवरच काम भागवावे लागत आहे. चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याने याचा फटका शासकीय कार्यालयांच्या आर्थिक व्यवहारालाही बसला आहे. अशीच परिस्थिीती जिल्हाभरातील पोस्टाच्या विविध शाखांची आहे.
नोटांसाठी दाहीदिशा!
By admin | Published: November 17, 2016 12:34 AM