लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वरण, भात, भाजी व पोळी ही जेवणाची क्रमावली असून दोनच्या वेळच्या जेवणात ताटात हे पदार्थ असलेला माणूस जगातला सर्वात सुखी माणूसच ठरणार. कारण, या दोन वेळच्या जेवणासाठी अवघ्या जगावर मानवजातीची धावपळ सुरू आहे. ताटातून यातील एक जरी पदार्थ चुकला तरी तो दिवस चांगला जात नाही. मात्र आजघडीला देशाला झपाटलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांना दोन वेळच्या जेवणासाठी धडपड करूनही ते कठीण होत चालले आहे. सर्वच वस्तूंचे दर भडकले असून किराणा माल असो की भाजीपाला त्यांचे भाव ऐकून धडकी भरू लागते.भाजीपाला महागला तर काही दिवस कडधान्य खाऊन काम चालवून घ्यावे असे नियोजन केले जात होते. मात्र आता कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर झाले असून त्यात भाजीपाला एवढा महागला आहे की, सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करताना घाम फुटत आहे. विशेष म्हणजे, आता उन्हाळ्यात पालेभाज्या बाजारातून गायब होणार असल्याने त्यांचे दर चांगलेच भडकले असून त्यांच्यापासून सर्वसामान्य माणूस चार हात लांबच राहत आहे. मात्र अन्य भाज्याही वधारल्या असून त्यांचे दर ऐकताच ते घेण्याची हिम्मत सर्वसामान्यांची होत नाही. यामुळेच आता भाजीपाल्याचे दर उतरत पर्यंत जेवणात कांदा-बटाटा किंवा टमाटरची चटणी याशिवाय पर्याय उरलेला नाही. परिणामी आता ताटातून भाजीपाला दिसेनासा झाला असून कांदा-बटाट्याची भाजी दिसून येत आहे.
कोठेही जा हेच दर
- भाजीपाला चांगलाच भडकला हे दर शहरांपुरतेच मर्यादित नसून कोठेही जा हेच दर दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातून येणारे कित्येक जण भाजीपाला शहरातील बाजारातून खरेदी करून नेतात. दरवाढीने गृहीणींचे अंदाजपत्रक बिघडले आहे.
लिंबू ३०० रुपयांवर
मध्यंतरी ६०-७० रूपये किलो वर असलेले लिंबू आता ३०० रूपये किलो दराने विकले जात आहे. काही दिवसांपूर्वीच असलेल्या नवरात्रीमध्येही नागरिकांना लिंबू मिळाले नाही अशी परिस्थिती आहे. दर भडकल्यामुळे आंबट लिंबू कडू झाला आहे..
भाव आणखी वाढणार
उन्हाळ्यात कित्येक भाज्यांचे उत्पादन होत नाही. शिवाय जो भाजीपाला येतो तो बहुतांश बाहेरून येतो. म्हणजेच, कमी उत्पादन व त्यात बाहेरून येत असल्याने लागणारे भाडे यामुळे भाजीपाल्याचे दर आणखी वाढणार यात शंका नाही.