खरीप हंगाम पूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेत शेतकरी शेतात राबत आहेत. नवतपा असताना नांगरणे, वखरणे सुरू झाले आहे. कृषी विभागाच्या सूचनेनुसार नर्सरीचे बेड तयार होत आहेत. पशुपालक शेतातून तनस घरी साठवणुकीचे काम सुरू केले आहे. यासाठी प्रती तासाला १०० ते २०० रुपये वाढ झाली आहे. कोरडवाहू शेतीच्या मशागतीपेक्षा रोवणीच्या मशागतीला अधिक खर्च आहे. पालांदूर येथे ९० रुपयापर्यंत इंधनाचे डिझेलचे दर, तर पेट्रोलचे दर १०१ रुपयापर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीने महागाईचा भस्मासूर पुढे आला आहे.
इंधन दरवाढ ही सर्वच क्षेत्रात महागाईकरिता कारणीभूत ठरत आहे. खते, बी-बियाणेसुद्धा महाग झाली आहेत. शेतकऱ्याला महागाईचा सामना करता करता आर्थिक गणित बिघडले आहे. सरकार शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेत आहे.
बॉक्स
धान खरेदी नाहीच
तब्बल महिना लोटूनसुद्धा आधारभूत धान खरेदी केंद्रअंतर्गत पालांदूर परिसरातील केंद्रात अजूनपर्यंत धान खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने आधारभूत केंद्र केवळ कागदावर ठेवलेले आहेत. प्रतिक्विंटल १८६८ रुपये भाव धानाला मिळावा या उद्देशाने विक्रीसाठी जात आहेत; परंतु अजूनही धान खरेदी झालेली नाही. महागाईच्या तुलनेत धानाचे दर अजिबात परवडणारे नाहीत. उत्पादन खर्च लक्षात घेता महागाईच्या वाढत्या टप्प्यानुसार धानाचेसुद्धा भाव वाढले पाहिजेत.