जिल्ह्यात हजारो घरगुती गॅस धारक आहेत. महिन्याकाठी सिलिंडरची उचल केली जाते. उज्ज्वला योजनेंतर्गत शेकडो लाभार्थी आहेत ; मात्र आता गॅसचे दर परवडण्यासारखे नसल्याने त्यांनी पुन्हा सरपणासाठी लाकडे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मार्च महिन्यात ८८१ रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर मिळाला. यावर गांभीर्याने उपाययोजना करावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.
सबसिडी मिळते नावापुरतीच
एक ते दीड वर्षात वीज, गॅस सबसिडीवर दोनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत सबसिडी मिळायची. सबसिडी म्हणजे नावापुरतीच असल्याचे गॅस ग्राहकांचे म्हणणे आहे. ही सबसिडी ही कशाला देता, असा उपरोधिक सवालही आता नागरिक विचारू लागले आहेत. कोरोना संकटकाळात जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होण्याऐवजी ते सातत्याने वाढत असल्याने गरिबांची फार पंचाईत झाली आहे. पाच महिन्यातील गॅस सिलिंडरच्या किमतीवर नजर घातल्यास नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडर ६६३ रुपयात मिळत होता. त्यानंतर याच्या दरात सातत्याने वाढ होत गेली आहे. जवळपास दोनशे सव्वीस रुपयांची वाढ झाली आहे.
कोट
कोरोना संकटकाळात गॅस सिलिंडरच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात आता १० रुपये कमी करून काय उपयोग. भाववाढीमुळे आगीत अजून तेल ओतण्याचे कार्य सुरू आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आर्थिक बजेट बिघडले आहे.
- संगीता गिरेपुंजे, गृहिणी, खरबी नाका
कोट
घरगुती गॅस सिलिंडर मागे झालेली वाढ ही गरिबांसाठी मारक ठरणारी आहे. हातावर कमाविणे व पानावर खाणाऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे. यावर उपाययोजना करून गॅस दरवाढीबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सबसिडी ही नावालाच मिळत आहे.
- अर्चना बोरकर, गृहिणी, भंडारा