एमडीआर, एक्सडीआर टी.बी.चा धोका : डॉ. रवी धकाते यांचे प्रतिपादनभंडारा : क्षयरोग रुग्णांनी डॉट्स अंतर्गत नियमित औषधोपचार घेवून एमडीआर, एक्सडीआर सारख्या अतिसंसर्गजन्य टी.बी. आजाराला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी केले. ते सामान्य रुग्णालय भंडारा येथे आयोजित करण्यात आलेल्या एमडीआर, एक्सडीआर टी.बी. डेथ आॅडिट सभेमध्ये बोलत होते.क्षय रोगाचा निदान व उपचार सर्व आरोग्य केंद्रात मोफत केला जात असून ठसा तपासणी क्षयरोग निदानाचा मार्ग आहे. जिल्ह्यात १५ ठिकाणी ठसा तपासणी केंद्र कार्यरत आहेत. ज्यात जिल्हा क्षयरोग केंद्र, ग्रामीण रुग्णालय मोहाडी, सिहोरा, अड्याळ, पवनी, लाखनी, पालांदूर, लाखांदूर, उपजिल्हा रुग्णालय साकोली, तुमसर, प्राथमिक आरोग्य केंद्र जांब, शहापूर, गोबरवाही, कोंढा येथे आहेत. ज्या रुग्णांना १५ दिवसापेक्षा जास्त काळ खोकला, अशक्तपणा, जेवण कमी होणे, वजन कमी होणे, ठस्यातून रक्त पडणे असे लक्षणे असल्यास तसेच मधूमेही, एचआयव्ही रूग्णांनी ठसा तपासणी करून घ्यावी व निदान झाल्यास मोफत औषधोपचार घेवून टी.बी. मुक्त व्हावे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली. सभेला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. खानखेडे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उईके, डॉ. मुकेश थोटे, डॉ. शेखर नाईक, डॉ. सुयोग मेश्राम, डॉ. कन्हीरे, डॉ. सुचिता वाघमार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)जिल्ह्यात एमडीआर टीबी रुग्णांवर औषधोपचार देणे सुरू असून २००७ पासून १२५ एमडीआर रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी २४ महिन्यांचा पूर्ण उपचार करून ३० रुग्ण बरे झाले तर २३ रुग्ण मृत्यू पावले. सध्या जिल्ह्यात २५ एमडीआर रुग्ण औषधोपचार घेत आहेत. या टीबीमध्ये दुरूस्त होण्याचे प्रमाण फारच कमी असून एमडीआर टीबी होऊ नये यासाठी टीबी रुग्णांनी सुरूवातीचा कॅट १ व २ चा नियमित औषधोपचार घ्यावा व दुरूस्त व्हावे.-शिवशंकर शेंडे, जिल्हा समन्वयक, जिल्हा क्षयरोग केंद्र भंडारा.
अनियमित औषधोपचारामुळे मानवाचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: August 13, 2016 12:21 AM