तुमसर: रिवा-इतवारी-रिवा ही प्रवासी गाडी २४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. परंतु तुमसर, भंडारा येथे थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशात असंतोष आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या येण्याची वेळ ही बदलल्याने सायंकाळी नागपूरवरून परत येण्यास ही गाडी सोयीची ठरणार आहे. बालाघाट येथे लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे पाच मिनिटाचा थांबा देण्यात आला. असाच दबाव येथे निर्माण करण्याची गरज आहे.
रविवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ४.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा एनोग्रेशन रन या गाडीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. प्रत्यक्षात २४ फेब्रुवारीपासून ही गाडी सुरू होत आहे. रिवा येथून ती सायंकाळी ५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी इतवारीला ०७.२५ ला पोहोचणार आहे. आठवड्यातून ही गाडी तीन दिवस राहणार असून, रिवा येथून सोमवार, बुधवार, शनिवारला सुटणार आहे. २५ फेब्रुवारीला इतवारीवरून रिवाकरिता ही गाडी धावणार आहे. इतवारीवरून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व रविवारला ही गाडी सोडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदल :
महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाडीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही गाडी नागपूर वरून ५ वाजता सुटायची. ती आता दुपारी ३.३० वाजता सुटत आहे. त्यामुळे दिवसभर नागपूर येथून काम केल्यानंतर सायंकाळची गाडी नाही. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही दुपारीच स्वतः असल्याने अनेकांना आता अडचण निर्माण झाली आहे. रिवा-इतवारी एक्स्प्रेस गाडी सायंकाळी ६ वाजता सुटत असल्याने किमान प्रवाशांना तीन दिवस येथे सोयीचे होणार आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
नागपूर विभागात भंडारा व तुमसर हे मोठे जंक्शन आहेत. येथून रेल्वेला महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. प्रवाशांची ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने रिवा इतवारी एक्स्प्रेस गाडीचा थांबा भंडारा व तुमसर येथे दिला नाही. भंडारा जिल्ह्याचे स्थान आहे, याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना संक्रमण काळात प्रवासी गाड्यांची संख्या कमी आहे तसेच एक्स्प्रेस गाड्यात तिकीट आरक्षण करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे मोठ्या रेल्वेस्थानकावर किमान एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची गरज आहे.