मुकेश देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी/मोठी : लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या दिघोरी मोठीची लोकसंख्या ही सात हजारांच्या वर आहे. तसेच राजकीय दृष्ट्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून तालुक्यात दिघोरीची ओळख आहे. असे असताना गत आठवडाभरापासून दिघोरीतील जनतेला अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच गावात नदी अन् पाणीटंचाई पदोपदी, अशी म्हणण्याची वेळ दिघोरीवासीयांवर आली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात दिघोरीवर कधीच पाणीटंचाईचे संकट आले नाही. मात्र, अधिकारी व पदाधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कधी नव्हे ती भीषण पाणीटंचाईला दिघोरीवासीयांना तोंड द्यावे लागत आहे. जलवाहिनी लिकेज असल्याचा प्रत्यय मार्च महिन्यातच अधिकारी व पदाधिकारी यांना आला आहे. सदर बाब माहीत असतानाही याचे गांभीर्य न ओळखता बेजबाबदारपणाचा प्रत्यय दिला. त्याचे परिणाम समोर आहेत.नदी तीरावरील पाण्याचे जॅकवेल कोसळण्याच्या स्थितीत नव्हतीच. ‘व्हायब्रेटर मशीन’चा वापर केला आणि कंपनाने जॅकवेल कोसळली, असा आरोप वारंवार होत असताना सुद्धा आजपावेतो पाणीपुरवठा विभागातील एकही बड्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेतली नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. यापूर्वी असलेल्या पाण्याच्या टाक्या त्यावेळच्या लोकसंख्येच्या आधारावर उभारण्यात आल्या होत्या. मात्र, आताची लोकसंख्या वाढली असल्याने मोठ्या जलकुंभाची गरज आहे. पाणी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढता येऊ शकतो.
तिसऱ्या दिवशी झाले टँकर गायब- निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हेच अधिकारी व पदाधिकारी यांनी गावात दोन दिवस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. मात्र, तिसऱ्या दिवसापासून टँकर कुठे गायब झाले याचा अजून थांगपत्ता लागला नाही. दोन दिवस फक्त काय श्रेय लाटण्यासाठी टँकर सुरू केले काय? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाण्याची टँकर का आले नाही, याबाबत विचारले असता, मी लग्नकार्यात आहे, आता काही मी सांगू शकत नाही, असे उत्तर देऊन मोकळे झाले. नदीपात्रात बंधारा बांधा- गावाची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. हाकेच्या अंतरावर नदी असताना आजपर्यंत पाणी अडविण्यासाठी बंधारा का बांधण्यात आला नाही, असा प्रश्न निर्माण होतो. पाणीटंचाईवर कायमची मात करता यावी, चूलबंद नदीवर बंधारा तयार करून ही समस्या कायमची निकाली काढता येऊ शकते.